मार्क

अध्याय : 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16


धडा 1

1 देवाचा पुत्रयेशू ख्रिस्त याच्या शुभवर्तमानाची सुरूवात.
2 यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात असे लिहिले आहे:“ऐका! मी माझ्या दूताला तुझ्याकडे पाठवीत आहे तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील. मलाखी 3:1
3 तेथे रानात एक व्यक्ति ओरडून सांगत होती: ‘प्रभूसाठी मार्ग तयार करा, त्याच्यासाठी वाटा सरळ करा.”‘ यशया 40 : 3
4 मग बाप्तिस्मा करणारा योहान आला व रानात लोकांचे बाप्तिस्मे करू लागला. लोकांना त्याने सांगीतले की, जर त्यांना त्यांची अंत:करणे बदलायची असतील तर त्यांनी पश्चात्तापाचा बाप्तिस्मा घ्यायला पाहिजे. मग त्यांच्या पापांची क्षमा केली जाईल.
5 यहूदीया व यरूशलेम येथील सर्व लोक योहानाकडे आले, त्यांनी आपली पापे कबूल केल्यावर त्याने त्यांचा यार्देन नदीत बाप्तिस्मा केला.
6 योहान उंटाच्या केसांपासून केलेली वस्त्रे वापरीत असे. त्याच्या कंबरेला कातड्याचा पट्टा होता आणि तो टोळ व रानमध खात असे.
7 योहानाने लोकांना हा संदेश दिला: “माझ्यापेक्षाही महान असा कोणी एक येत आहे, तो माझ्यानंतर येत आहे. मी त्याच्या वहाणांचा बंद सोडण्याच्यादेखील पात्रतेचा नाही.
8 मी तुमचा पाण्याने बाप्तिस्मा करतो पण तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करील.”
9 त्यावेळी येशू गालीलातील नासरेथहून जेथे योहान होता त्या ठिकाणी आला. यार्देन नदीत योहानाने येशूचा बाप्तिस्मा केला.
10 येशू पाण्यातून वर येत असता त्याने आकाश उघडलेले पाहिले. आणि पवित्र आत्मा त्याच्यावर कबुतरासारखा आला.
11 आकाशातून वाणी झाली. ती म्हणाली, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्यावर मी प्रेम करतो. तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.”
12 नंतर आत्म्याने येशूला एकट्याला रानात पाठविले.
13 येशू रानात चाळीस दिवस होता. तो तेथे हिंस्त्र प्राण्यांबरोबर होता. तो तेथे असता सैतान त्याला मोह पाडून त्याची परीक्षा बघत होता. पण दूत येऊन त्याची सेवा करीत होते.
14 यानंतर, योहानाला तुरुंगात टाकण्यात आले. येशू गालीलास गेला व देवाकडून आलेली सुवार्ता त्याने सांगितली.
15 येशू म्हणाला, “आता योग्य वेळ आली आहे. देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चात्ताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा.
16 येशू गालीलाच्या सरोवराजवळून जात होता तेव्हा त्याने शिमोनव शिमोनाचा भाऊ अंद्रिया याला सरोवरात जाळे टाकताना पाहिले कारण ते मासे धरणारे होते.
17 येशू त्यांना म्हणाला, “माझ्या मागे या म्हणजे मी तुम्हांला माणसे धरणारे करीन.
18 मग ते लगेचच जाळी सोडून त्याच्यामागे चालू लागले.
19 आणि तो थोडा पुढे गेल्यावर त्याला जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान हे दिसले. ते त्यांच्या नावेत होते व आपली जाळी तयार करीत होते.
20 त्याने लगेच त्यांना हाक मारली. मग त्यांनी आपले वडील जब्दी व नोकरचाकर यांना नावेत सोडले आणि ते त्याच्या मागे गेले.
21 येशू व त्याचे शिष्य कफर्णहूमास गेले. लगेच येणाऱ्या शब्बाथ दिवशी येशू सभास्थानात गेला आणि लोकांना त्याने शिकविले.
22 त्याच्या शिकवणुकीने ते चकित झाले, कारण येशू नियमशास्त्राच्या शिक्षकांप्रमाणे शिकवीत नव्हता, तर त्याला अधिकार असल्यासारखा शिकवीत होता.
23 त्यांच्या सभास्थानात एक भूतबाधा झालेला मनुष्य होता, तो एकदम मोठ्याने ओरडला,
24 आणि म्हणाला, “नासरेथच्या येशू, तुला आमच्याकडून काय पाहिजे? तू आमचा नाश करावयास आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे, देवाचा पवित्र असा तू आहेस.”
25 परंतु येशूने त्याला अधिकारवाणीने म्हटले, “शांत राहा व याच्यातून नीघ.”
26 नंतर अशुद्ध आत्म्याने त्याला पिळले व तो मोठ्याने ओरडून त्याच्यातून बाहेर गेला.
27 आणि लोक आश्चर्यचकित झाले, व एकमेकांस विचारू लागले, “येथे काय चालले आहे? हा मनुष्य कही तरी नवीन शिकवीत आहे. आणि तो अधिकाराने शिकवीत आहे. तो दुष्ट आत्म्यांना आज्ञा करतो आणि ते त्याचे ऐकातात!
28 मग येशूविषयीची बातमी ताबडतोब गालीलाच्या सर्व प्रदेशात पसरली.
29 येशू व त्याच्या शिष्यांनी सभास्थान सोडले आणि लागलीच ते योहान व याकोब यांच्याबरोबर शिमोन व अंद्रिया यांच्या घरी गेले.
30 शिमोनाची सासू तापाने बिछान्यावर पडली होती. तेव्हा त्यांनी ताबडतोब येशूला तिच्याविषयी सांगिताले.
31 तो तिच्याकडे गेला आणि तिला हाताला धरून त्याने उठविले. आणि तिचा ताप निघून गेला व ती त्याची सेवा करू लागली.
32 संध्याकाळ झाली आणि सूर्य अस्ताला गेल्यावर त्यांनी सर्व आजारी लोकांस आणि भुतांनी पछाडलेल्या लोकांस त्याच्याकडे आणले.
33 तेव्हा सर्व शहर घरापाशी दारापुढे जमा झाले.
34 त्याने निरनिराळ्या रोगांनी आजारी असलेल्यांना बरे केले व अनेक लोकांतून भुते काढली. पण त्याने भुतांना बोलू दिले नाही कारण ती त्याला ओळखत होती.
35 अगदी पहाटेच अंधार असतानाच त्याने घर सोडले आणि तो एकांत स्थळी गेला. तेथे त्याने प्रार्थना केली.
36 शिमोन व त्याच्यासोबत असलेले येशूचा शोध करीत होते,
37 आणि जेव्हा त्यांना तो सापडला तेव्हा ते त्याला म्हणाले, “सर्वजण तुमचा शोध करीत आहेत.”
38 तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “आपण जवळपासच्या ठिकाणी जाऊ या, म्हणजे मला तेथे देखील उपदेश करणे शक्य होईल. कारण त्या कारणासाठीच मी बाहेर पडलो आहे.”
39 मग तो सर्व गालीलातून, त्यांच्या सभास्थातून उपदेश करीत आणि भुते काढीत फिरला.
40 एक कुष्ठरोगी येशूकडे आला व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याने स्वत:ला बरे करण्याची विनंति केली. तो येशूला म्हणाला, “जर तुमची इच्छा असेल तर तुम्हामध्ये मला शुद्ध करण्याचे सामर्थ आहे.
41 येशूला त्याची दया आली. मग त्याने हात लांब केला आणि त्याला स्पर्श केला व त्याला म्हणाला, “मला तुला बरे करावयाचे आहे. तुझा कुष्टरोग बरा होवो.”
42 आणि लगेच त्याचे कुष्ठ गेले व तो शूद्ध झाला.
43 येशूने त्याला सक्त ताकीद दिली व लगेच जाण्यास सांगितले. येशू त्याला म्हणाला,
44 “पाहा, याविषयी कोणाला काहीही सांगू नकोस, परंतु जा आणि स्वत:ला याजकाला दाखव. व स्वत:च्या शुद्धीकरणासाठी मोशेच्या आज्ञेप्रमाणे अर्पण कर. हे यासाठी कर की, तू शुद्ध झाला आहेस याची त्या सवांर्ना साक्ष पटावी.
45 परंतु तो मनुष्य गेला व त्याने मोकळेपणाने सांगण्यास सुरुवात केली व ही बातमी पसरविली. याचा परिणाम असा झाला की, येशूला उघडपणे शहरात जाता येईना. म्हणून तो एकांतवासात राहिला. आणि चोहोबाजूंनी लोक त्याच्याकडे आले.