धडा 6
1 पुढे, आम्ही भिंत बांधल्याचे सनबल्लट, तोबीया, गेशेम हा अरब आणि आमचे इतर शत्रू यांनी ऐकले. भिंतीतली भगदाडे आम्ही बुजवली पण वेशीचे दरवाजे अजून बसवले गेले नव्हते.
2 तेव्हा सनबल्लट आणि गेशेम यांनी मला असा निरोप पाठवला: “नहेम्या, ये. आपण एकमेकांना भेटू. ओनोंच्या मैदानावर केफिरिम या गावात आपण एकत्र जमू.” पण त्यांचा हेतू मला इजा करण्याचा होता.
3 तेव्हा मी माझ्या निरोप्यांमार्फत पुढीलप्रमाणे निरोप पाठवला: “एका महत्वाच्या कामात असल्यामुळे मी खाली येऊ शकत नाही. तुम्हाला भेटायला आल्यामुळे काम थांबावे असे मला वाटत नाही.”
4 सनबल्लट आणि गेशेम यांनी हाच निरोप माझ्याकडे चार वेळा पाठवला. आणि मी ही त्यांना प्रत्येक वेळी हेच उत्तर पाठवले.
5 मग, पाचव्या वेळी सनबल्लटने आपल्या मदतनीसा करवी हाच निरोप मला दिला. यावेळी त्याच्याकडे उघडे पत्र होते.
6 पत्रातला मजकूर असा होता. “येथे एक अफवा पसरली आहे. लोक सर्वत्र तेच बोलत आहेत. खेरीज, गेशेमच्या म्हणण्याप्रमाणे त्यात तथ्य आहे. तू आणि यहुदी मिळून राजाविरुध्द बंड करायच्या बेतात आहात असे लोक म्हणतात. म्हणूनच तुम्ही यरुशलेमच्या तटबंदीचे बांधकाम करत आहात. तू यहुदी लोकांचा नवा राजा होणार असेही लोक म्हणतात.
7 “यहुदात राजा आहे. असे स्वत:बद्दल घोषित करायला तू यरुशलेममध्ये संदेष्टे नेमले आहेस अशीही एक अफवा आहे.नहेम्या, राजा अर्तहशश्तच्या हे सगळे कानावर जाईल हे मी तुला बजावून ठेवतो. तेव्हा, ये आपण एकदा भेटून त्याबद्दल बोलू.”
8 तेव्हा मी सनबल्लटला उलट उत्तर पाठवले की, “तू म्हणतोस तसे काही चाललेले नाही. या केवळ तुझ्याच मनातल्या कल्पना आहेत.”
9 आमचे शत्रू आम्हाला भीती दाखवायचा प्रयत्न करत होते. ते मनात म्हणत होत, “यहुदी घाबरतील आणि काम चालू ठेवण्याची उमेद त्यांच्यात राहणार नाही. मग भिंतीचे काम पुरे होणार नाही.”मग मी प्रार्थना केली, “देवा, मला बळ दे.”
10 मी एकदा दलायाचा मुलगा शमाया याच्या घरी गेलो. दलाया हा महेतबेलचा मुलगा. शमायाला आपल्या घरीच थांबून राहावे लागले होते. तो म्हणाला,“नहेम्या, आपण देवाच्या मंदिरात भेटू. आत पवित्र जागेत जाऊन आपण दरवाजे बंद करु, कारण लोक तुला मारायला येत आहेत. ते आज रात्रीच तुला मारायला येतील.”
11 पण मी शमायाला म्हणालो, “माझ्यासारख्याने पळून जावे? जीव बचावण्यासाठी माझ्यासारख्या माणसाने मंदिरात जाऊन बसू नये. मी जाणार नाही.”
12 शमायाला देवाने पाठवले नव्हते हे मला माहीत होते. त्याने माझ्याविरुध्द भाकीत केले कारण तोबीया आणि सनबल्लटने त्याला त्याबद्दल पैसे चारले होते, हे मी जाणून होतो.
13 मला हैराण करून घाबरवावे यासाठी शमायाला पैसे दिले जात होते. घाबरुन जाऊन लपून बसण्यासाठी मंदिरात जाण्याचे पाप माझ्या हातून व्हावे अशी त्यांची इच्छा होती. तसे झाले असते तर माझी अप्रतिष्ठा करायला आणि माझी अपकीर्ती करायला माझ्या शत्रूंना ते एक कारण मिळाले असते.
14 देवा, कृपा करून तोबीया आणि सनबल्लट यांची आठवण ठेव. त्यांनी केलेली दृष्कृत्ये आठव. मला भय दाखवणारी नोवद्या ही संदेष्टी आणि इतर संदेष्टे यांचे ही स्मरण असू दे.
15 मग अलूल महिन्याच्या पंचविसाव्या दिवशी यरुशलेमच्या भिंतीचे काम समाप्त झाले. भिंतीचे काम व्हायला बावन्न दिवस लागले.
16 कोट बांधण्याचे काम पूर्ण झाल्याचे आमच्या सर्व शत्रूंनी ऐकले. ते पूर्ण झाल्याचे आमच्या भोवतींच्या सर्व राष्टांनी पाहिले आणि त्यांचे धैर्य गळून गेले. कारण आमच्या देवाच्या मदतीने हे काम झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
17 शिवाय, तटबंदिचे काम पूर्ण झाल्यांनतरच्या काळात यहुदातील श्रीमंत लोक तोबीयाला सारखी पत्रे पाठवत होती. तोबीया त्यांना उत्तरे देत होता.
18 यहुदातील बऱ्याच लोकांनी त्याच्याशी प्रामाणिक राहायचे त्याला वचन दिले होते म्हणून ते ही पत्रे पाठवत होते. कारण, आरहाचा मुलगा शखन्या याचा तोबीया जावई होता. आणि तोबीयाचा मुलगा योहानान याचे मशुल्लामच्या मुलीशी लग्र झाले होते. मशुल्लाम हा बरेख्याचा मुलगा.
19 आणि पूर्वी या लोकांनी तोबीयाला एक खास वचन दिले होते. त्यामुळे तोबीया किती चांगला आहे हे ही माणसे मला सारखी सांगत. आणि मी काय करत असे ते तोबीयाला सांगत राहात. मला भयभीत करण्यासाठी मग तोबीया मला पत्रे पाठवी.