धडा 5
1 अनेक गरीब लोकांनी आपल्या यहुदी बांधवांविरुध्द तक्रार करायला सुरुवात केली.
2 त्यांच्यापैकी काहीजण म्हणू लागले, “आम्हाला बरीच मुले बाळे आहेत. आम्हाला खायला मिळावे आणि आम्ही जिवंत राहावे यासाठी आम्हांला धान्य तर मिळाले पाहिजे.”
3 इतर काही म्हणत होते, “सेध्या दुष्काळ आहे. धान्यासाठी आम्हाला आमची शेंत, द्राक्षमळे आणि घरे गहाण टाकावी लागत आहेत.”
4 आणखी काही म्हणत, “आमची शेते आणि द्राक्षमळे यांच्यावर आम्हाला राजाचा कर लागत आहे. पण तो भरणे परवडत नसल्यामुळे आम्हाला पैसे उसने घ्यावे लागत आहेत.
5 ते श्रीमंत लोक पाहा! आम्ही त्यांच्यासारखेच तर आहोत. त्यांच्या मुलांसारखीच आमची मुले आहेत. पण आम्हांला आमची मुले मुली गुलाम म्हणून विकावी लागली. काहींना तर आपल्या मुलींना गुलाम म्हणून विकणे भाग पडलेले आहे. आम्ही असहाय आहोत. आमची शेती आणि द्राक्षमळे तर गेलेच. ते आता इतर लोकांच्या मालकीचे आहेत.”
6 या तक्रारी ऐकल्या तेव्हा मला अतिशय संताप आला.
7 पण मी स्वत:ला शांत केले आणि मग श्रीमंत कुटुंबे आणि कारभारी यांच्याकडे गेलो. त्यांना म्हणालो, “तुम्ही लोकांना जी रक्कम कर्जाऊ देता तिच्यावर व्याज द्यायची तुम्ही या आपल्याच माणसांना बळजबरी करत आहात. ते तुम्ही थांबवले पाहिजे.” मग मी सर्व लोकांना एकत्र बोलावले.
8 त्यांना मी म्हणालो, “आपले यहुदी बांधव इतर देशामध्ये गुलाम म्हणून विकले गेले होते. त्यांना पुन्हा विकत घेऊन मुक्त करण्याचे आपण सर्वतोपरी प्रयत्न केले. आणि आता पुन्हा तुम्ही त्यांना गुलामासारखे विकत आहा!”ते श्रीमंत लोक आणि अधिकारी गप्प राहिले. त्यांना काही बोलायला जागा उरली नाही.
9 तेव्हा मी त्यांच्याशी बोलत राहिलो. मी म्हणालो, “तुम्ही जे करत आहात ते बरोबर नाही. देवाविषयी भय आणि आदर बाळगावा हे तुम्ही जाणता. इतर लोकांसारखी लाजिरवाणी कृत्ये तुम्ही करु नयेत.
10 माझे लोक,माझे भाऊ आणि मी सुध्दा लोकांना पैसे आणि धान्य उधार देत आहोत. पण त्यावरचे व्याज त्यांना सक्तीने द्यायला लावणे थांबवले पाहिजे.
11 त्यांची शेती, द्राक्षमळे, जैतुनाचे मळे आणि घरे तुम्ही त्यांना आत्ताच्या आत्ता परत करा. त्यांना लावलेले व्याजही तुम्ही परत करा. त्यांना जे पैसे, धान्य, नवीन द्राक्षारस आणि तेल तुम्ही कर्जाऊ दिलेत त्यावर तुम्ही एक टक्का व्याज लावले आहे. ते तुम्ही त्यांना परत करा.”
12 यावर ते श्रीमंत लोक आणि अधिकारी म्हणाले, “आम्ही ते परत करु आणि आम्ही त्यांच्या कडून आधिक काही मागणार नाही. नहेम्या, आम्ही तुझ्या म्हणण्याबरहुकूम वागू.”मग मी याजकांना बोलावून घेतले. श्रीमंत लोक आणि अधिकारी जे बोलले त्याप्रमाणे वागण्याचे मी त्यांना देवासमोर वचन द्यायला लावले.
13 मग मी माझ्या वस्त्रावरच्या चुण्या झटकत म्हणालो, “आपले वचन जो पाळत नाही त्या प्रत्येकाची गत देव अशीच करतो. देव त्यांना त्यांच्या घरातून झटकून टाकील. ज्यासाठी त्यांनी कामधंदा केला ते त्यांच्यापासून हिरावून घेतले जाईल. तो माणूस सर्वस्वाला मुकेल.”माझे सांगून झाले. आणि सर्वजण त्याच्याशी सहमत झाले. ते सर्व म्हणाले, “आमेन!” मग त्यांनी परमेश्वराचे गुणगान केले. आपल्या वचनाप्रमाणे लोक वागले.
14 शिवाय, यहुद्यांच्या भूमीवर राज्यपाल म्हणून माझी नेमणूक असतानाच्या त्या काळात मी अथवा माझ्या भाऊबंदांनी राज्यपालाच्या दर्जाचे अन्न घेतले नाही. माझ्या अन्नासाठी लोकांवर कर भरायची सक्त मी केली नाही अर्तहशश्त राजाच्या कारकीर्दीच्या विसाव्या वर्षापासून बत्तिसाव्या वर्षापर्यंतमी अधिकारी होतो. मी यहुदाचा बारा वर्षे अधिकारी होतो.
15 पण माझ्या आधी सतेवर असलेल्या राज्यपालांनी लोकांना त्रस्त केले. या अधिकाऱ्यांनी लोकांना प्रत्येकी एक पौंड चांदी बळजबरीने द्यायला लावली. लोकांना त्यांनी अन्न आणि द्राक्षारस द्यायला भाग पाडले. या राज्यपालांच्या हाताखालच्या प्रमुखांनीही लोकांवर सत्ता गाजवली आणि त्यांचे जिणे खडतर केले. पण मी देवाविषयी भय आणि आदर बाळगला. त्यामुळे अशा गोष्टी केल्या नाहीत.
16 यरुशलेमची तटबंदी उभारायला मी कष्ट घेतले. भिंतीचे काम करायला माझी सर्व माणसे एकत्र आली. आम्ही कोणाची जमीन बळकावली नाही!
17 शिवाय माझ्या मेजावर मी नेहमीच दीडशे यहूदींना अगत्याने जेवायला घालत असे. शिवाय आसपासच्या राष्टांतून आलेल्या लोकांनाही मी जेवू घालत असे.
18 मेजावर माझ्या पंकतीला बसणाऱ्यांसाठी म्हणून रोजचे अन्नाचे प्रमाण पुढीप्रमाणे असे: एक गाय, सहा निवडक मेंढरे आणि वेगवेगळया प्रकारचे पक्षी शिवाय दहा दहा दिवसांच्या अंतराने सर्व प्रकारचे द्राक्षारस माझ्या मेजावर पुरवण्यात येत. तरीही, अधिकाऱ्यासाठी ज्या प्रकारच्या अन्नाची मुभा असते त्याची मागणी मी कधीही केली नाही. माझ्या अन्राची किंमत म्हणून मी लोकांना कर भरायची सवती कधीही केली नाही. लोकांचे काम अतिशय कष्टाचे आहे हे मी जाणून होतो.
19 देवा, या लोकांकरीता मी जे भले केले ते ध्यानात असू दे.