1 पेत्र

अध्याय : 1 2 3 4 5


धडा 3

1 त्याचप्रमाणे, पत्नींनो, आपल्या पतींच्या अधीन असा. यासाठी की, त्यांच्यापैकी काहींनी जर देवाची आज्ञा पाळली नाही तर काही न बोलताही आपल्या सदवर्तनाने त्यांची मने जिंकता येतील.
2 जेव्हा ते तुमचे शुद्ध आणि आदरयुक्त वागणे पाहतील
3 तुमची सुंदरता बाह्यस्वरुपाची नसावी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे केस सुशोभित करण्याने, सोन्याचे दागिने वापरण्याने किंवा चांगले कपडे घातल्याने आलेली नसावी.
4 त्याऐवजी तुमची सुंदरता अंत:करणाची, जी कधीही नाश पावत नाही, अशी असली पाहिजे ती सौम्य, शांत स्वभावाची असली पाहिजे जी देवाच्या दृष्टीने अतिमौल्यवान आहे.
5 पूर्वीच्या काळतील ज्या पवित्र स्त्रिया होऊन गेल्या, त्यांनी अशाच प्रकारे आपल्या सर्व आशा देवावर केन्द्रीत करुन आपली स्वत:ची सुंदरता वाढीस लावली त्या स्त्रिया आपल्या पतींच्या अधीन असत.
6 साराने अब्राहामाची आज्ञा पाळली आणि अब्राहामाला आपला मालक मानले. जर तुम्ही चांगली कामे करता व कशाचीही भिति मनात बाळगत नाही तर तुम्ही तिच्या म्हणजे सारेच्या मुली आहात.
7 तसेच पतींनो, तुम्ही आपल्या पत्नींबरोबर समंजसपणाने राहा. त्या जरी अबला असल्या तरी त्या देवाच्या कृपेमध्ये तुमच्याबरोबरच वारस आहेत हे लक्षात घेऊन त्यांच्याविषयी आदर बाळग, म्हणजे तुम्ही ज्या प्रार्थना देवाला सादर करता त्यात कसलीही बाधा येणार नाही.
8 शेवटी सारांश हा की, तुम्ही सर्वजण एकमेकांशी विचार व भावना यांच्या ऐक्याने, सहानुभूतीने आपल्या भाऊबहिणींशी प्रेमाने, दयाळूपणे आणि नम्रतेने राहा.
9 वाइटाची परतफेड वाइटाने करु नका, किंवा अपमानाची फेड अपमानाने करु नका. उलट, त्या व्यक्तीसाठी देवाकडे आशीर्वाद मागा. कारण देवाने तुम्हाला हे करण्यासाठीच बोलाविले होते. यासाठी की, तुम्हाला देवाचा आशीर्वादाचा वारसा मिळावा.
10 पवित्र शास्त्र म्हणते,“ज्याला जीवनाचा आनंद उपभोगायचा आहे, व चांगले दिवस पहावयाचे आहेत, त्याने आपली जीभ वाईट बोलण्यापासून आवरली पाहिजे, आणि त्याने आपल्या ओठांनी खोट्या गोष्टी बोलू नयेत.
11 दुष्टतेपासून त्याने दूर व्हावे व चांगले ते करावे. त्याने शांतीचा शोध करुन ती मिळविली पाहिजे
12 जे नीतिमान लोक आहेत त्यांच्यावर प्रभुची नजर असते आणि त्यांच्या प्रार्थना तो कान देऊन ऐकतो पण जे वाईट गोष्टी करतात त्यांच्याकडे प्रभु पाठ फिरवितो.”स्तोत्र. 34:12-16
13 जे चांगले ते करण्यास तुम्ही उत्सुक असाल तर अशी कोण व्यक्ती आहे जी तुम्हाला इजा करण्याचा प्रयत्न करील? पण,
14 जे योग्य ते करुनसुद्धा जर तुम्हांला दु:ख सहन करावे लागते, तर तुम्ही धन्य आहात. म्हणून “त्या लोकांची भीति बाळगू नका किंवा गर्भगळित होऊ नका”
15 पण आपल्या अंत:करणात ख्रिस्त हा प्रभु आहे असा आदर बाळगा तुमच्यामध्ये जी आशा आहे, तिच्याविषयी तुम्हांला कोणी विचारले तर त्याचे समर्थन करण्यास सदैव तयार राहा.
16 पण हे सौम्यतेने व आदराने करा. ख्रिस्तामध्ये जगत असताना तुमच्या चांगल्या वागणुकीवर जे आरोप करतात त्यांना लाज वाटेल, अशा रीतीने तुम्ही आपली विवेकबुद्धी शुद्ध राखा.
17 कारण चांगले काम करुनदेखील आपण दु:ख सोसावे अशी जर देवाची इच्छा असेल तर वाईट करुन दु:ख भोगण्यापेक्षा ते अधिक चांगले.
18 ख्रिस्तदेखील आपल्या पापांसाठी एकदाच मरण पावला. एक नीतिमान दुसऱ्या अनीतिमानांसाठी मरण पावला. यासाठी की, तुम्हाला देवाकडे जाता यावे. त्याच्या आत्म्यासंबंधी म्हटले तर त्याला पुन्हा जीवन दिले गेले.
19 आत्मिक रुपाने देखील ख्रिस्त बंदिवासात असलेल्या आत्म्यांकडे गेला व सुवार्ता सांगितली.
20 फार पूर्वी नोहाच्या काळात जेव्हा जहाज बांधले जात होते आणि देव धीराने वाट पाहत होता, त्यावेळी ज्यांनी देवाची आज्ञा पाळली नाही, तेच हे आत्मे होत. फक्त थोडकेच म्हणजे आठ लोकच जहाजात गेले व त्यांचा पाण्यापासून बचाव झाला.
21 ते पाणी आत्मा चिन्हात्मकरीत्या बाप्तिस्म्याचे ज्यामुळे आता तुमचे तारण होते त्याचे प्रतीक आहे. बाप्तिस्मा म्हणजे शरीरावरील धूळ काढणे नव्हे, तर तो देवाकडे शुद्ध विवेक मिळावा म्हणून केलेला करार आहे. हे सर्व येशू ख्रिस्ताच्या मरणातून पुन्हा उठण्यामुळे घडू शकले.
22 तो स्वर्गात गेलेला आहे आणि देवाच्या उजव्या हाताशी बसला आहे. देवदूत, अधिकार आणि सामर्थ्य हे सर्व त्याच्या अधीन आहेत.