2 तीमथ्थाला

अध्याय : 1 2 3 4


धडा 1

1 येशू ख्रिस्तामध्ये असलेल्या जीवनाविषयीच्या अभिवचनाची घोषणा करण्यास, देवाच्या इच्छेने पाठविलेला ख्रिस्त प्रेषित पौल याजकडून,
2 प्रिय मुलगा तीमथ्य याला, देवपिता आणि आमचा प्रभु येशू ख्रिस्त याच्यापासून कृपा दया व शांति असो.
3 माझ्या पूर्वजांप्रमाणे ज्या देवाची मी शुद्ध विवेकभावाने भक्ती करतो, त्या देवाचे मी उपकार मानतो; आणि रात्रंदिवस माझ्या प्रार्थनेत तुझी नेहमी आठवण करतो.
4 माझ्यासाठी तू ढाळलेल्या अश्रूंची आठवण करताना तुला भेटण्याची आतुरतेने वाट पाहतो. यासाठी की मी आनंदाने भरूने जावे.
5 तुझ्यातील प्रामाणिक विश्वासाचे मला स्मरण होते जो पहिल्यांदा तुझी आजी लोईसमध्ये होता आणि तुझी आई युनीकेमध्ये होता. आणि माझी खात्री आहे की तोच विश्वास तुझ्यामध्येही आहे.
6 या कारणासाठी मी तुला आठवण करून देतो की, जेव्हा मी माझे हात तुझ्यावर ठेवले तेव्हा देवाच्या दानाची जी ज्योत तुला मीळाली ती तेवत ठेव.
7 कारण देवाने आम्हांला भित्रेपणाचा आत्मा दिला नाही. तर तो सावधानतेचा व सामर्थ्याची स्फूर्ति देणारा आतमा दिला आहे.
8 म्हणून आपल्या प्रभूविषयी साक्ष देण्यासाठी लाज धरु नको किंवा मी जो त्याच्यासाठी कैदी झालो त्या माझी लाज धरू नको. तर माझ्याबरोबर सुवर्तेसाठी दु:ख सोस. देव तुला जे सामर्थ्य देतो त्याच्या साहाय्याने दु:ख सोस.
9 त्याने आम्हांला तारले आणि त्याने आम्हांला समर्पित जीवनासाठी पाचारण केले. आम्ही काही सत्कृत्ये केली म्हणून नाही तर त्याच्या स्वत:च्या हेतूने व कृपेने केले. ही कृपा काळाच्या सुरुवातीलाच देवाने ख्रिस्त येशूमध्ये आम्हांस दिली होती.
10 पण जी आता आम्हाला आमचा तारणारा ख्रिस्त येशू याच्या भूतलावर अवतीर्ण होण्याने प्रगट करण्यात आली आहे. ख्रिस्ताने मरणाचा नाश केला आणि सुवार्तेद्वारे अमरत्व व जीवन प्रकाशात आणले.
11 मला त्या सुवार्तेचा उपदेशक, प्रेषित आणि शिक्षक असे नेमले होते.
12 आणि या कारणांमुळे मीसुद्धा दु:ख भोगीत आहे. परंतु मी लाजत नाही कारण ज्याच्यावर मी विश्वास ठेवला आहे त्याला मी जाणतो आणि माझी खात्री पटली आहे की, तो दिवस येईपर्यंत त्याने जे माझ्याकडे सोपविले आहे त्याचे तो रक्षण करील.
13 माझ्याकडून ऐकून घेतलेल्या सत्य शिक्षणाचा गाभा दृढ धर. आणि ख्रिस्त येशूमध्ये सापडणाऱ्या विश्वासाने व प्रीतीने ते कर.
14 आपणामध्ये वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्याद्वारे त्या चांगल्या ठेवीचे रक्षण कर.
15 आशिया प्रांतामध्ये असणाऱ्या सर्वांनी मला सोडले आहे हे तुला ठाऊकच आहे. त्यामध्ये फुगल व हर्मगनेस आहेत.
16 अनेसिफराच्या घरावर प्रभु दया दाखवो. कारण त्याने अनेकदा माझे समाधान केले आहे. आणि माझ्या तुरूंगात असण्याची त्याला लाज वाटली नाही.
17 उलट रोममध्ये असताना त्याने माझा तपास लागेपर्यंत कसोशीने माझा शोध केला.
18 प्रभु करो आणि त्याला त्या दिवशी प्रभुकडून दया मिळो कारण माझ्या इफिसातील वास्तव्य काळात त्याने अनेक प्रकारे माझी सेवा केली हे तुला चांगले माहीत आहे.