धडा 7
1 बंधूनो, तुम्हांस माहीत नाही काय? कारण नियमशास्त्र माहीत असलेल्या लोकांबरोबर मी बोलत आहे की, जोपर्यंत मनुष्य जिवंत आहे, तोपर्यंत नियमशास्त्र त्याच्यावर सता चालविते.
2 कारण लग्न झालेली स्त्री जोपर्यंत तिचा पती जिवंत आहे तोपर्यंत ती नियमशास्त्राने त्याला बांधलेली असते, पण जर तिचा नवरा मेला तर ती पतीविषयीच्या नियमातून मोकळी होते.
3 म्हणून पती जिवंत असताना ती दुसन्याची झाली, तर तिला व्यभिचारिणी असे म्हणतील. पण जर तिचा पती मरण पावला तर ती लग्नाच्या नियमातून मुक्त होते आणि जरी ती दुसऱ्या पुरुषाची पत्नी झाली तरी ती व्यभिचारिणी होत नाही.
4 माझ्या बंधूनो, अशाच प्रकारे नियमशास्त्राप्रमाणे तुम्हांलाही ख्रिस्ताच्या शरीराद्वारे ठार मारण्यात आले यासाठी की तुम्ही दुसऱ्या पुरुषाचे, जो मेलेल्यातून उठविला गेला होता त्याचे व्हावे, यासाठी की देवाच्या सेवेसाठी आमचा वापर व्हावा.
5 कारण जेव्हा आम्ही आमच्या पापी मानवी स्वभावाप्रमाणे जगत होतो तेव्हा पापी वासना नियमशास्त्राच्या द्वारे मरणाला फळ देण्यासाठी आपल्या अवयवामध्ये कार्य करीत होत्या.
6 ज्या नियमशास्त्रामध्ये आम्ही कैदी झालो होतो त्यात आम्ही मेलेलो असल्याने आता आम्ही नियमशास्त्रापासून मुक्त आहोत तेव्हा आता आम्ही देव, आमचा प्रभु याची पवित्र शास्त्राच्या जुनेपणाप्रमाणे नव्हे तर आत्म्याच्या नवेपणाप्रमाणे सेवा करतो.
7 तर मग आता आपण काय म्हणतो? नियमशास्त्र पाप आहे असे आम्ही म्हणावे काय? खात्रीने नाही! कारण नियमशास्त्रावाचून पाप काय आहे हे मला समजले नसते. खरोखर “लोभ धरु नको” असे नियमशास्त्राने सांगितले नसते तर लोभ म्हणजे काय हे मला माहीत झाले नसते.
8 परंतु पापाने संधी साधली आणि मजमध्ये सर्व प्रकारचा लोभ भरला. कारण नियमशास्त्राशिवाय पाप मृतवत आहे.
9 एके काळी मी नियाशास्त्राशिवाय जगत होतो, परंतु जेव्हा नियमशास्त्र आले तेव्हा पाप संजीवित झाले.
10 आणि मी मरण पावलो, जी आज्ञा जीवन आणण्यासाठी योजण्यात आली होती तिचा परिणाम माझ्यासाठी मरण असा झाला.
11 कारण पापाने संधी साधली आणि त्या आज्ञेयोगे मला फसविले व तिच्याद्वारे ठार केले.
12 म्हणून आम्ही असा निष्कर्ष काढतो की, नियमशास्त्र पवित्र आहे आणि आज्ञा पवित्र, नीतिमान आणि उत्तम आहेत.
13 याचा अर्थ असा आहे का, की जे उत्तम होते ते माझ्यासाठी मरण होते काय? खात्रीने नाही! परंतु पाप हे पाप म्हणून ओळखले जावे म्हणून त्याने जे उत्तम त्याद्वारे मजमध्ये मरण निर्माण केले. यासाठी की, पाप त्या आज्ञेमुळे कमालीचे पापिष्ठ व्हावे.
14 कारण आम्हांला माहीत आहे की, नियमशास्त्र आत्मिक आणि मी दैहिक मनुष्य आहे. मी गुलाम म्हणून पापांत शरणागत राहावे म्हणून विकलेला असा आहे.
15 मी काय करतो हे मला माहीत नाही कारण काय करायचे हे मला माहीत नाही. कारण ज्या गोष्टींचा मी द्वेष करतो, त्याच गोष्टी मी करतो.
16 आणि ज्या गोष्टी मला कराव्याशा वाटत नाही त्याच करतो तर नियमशास्त्र उत्तम आहे हे मान्य करतो.
17 परंतु खरे तर मी त्या करतो असे नव्हे तर माझ्या ठायी वसत असलेले पाप त्या गोष्टी करते.
18 होय, मला माहीत आहे की, जे चांगले आहे ते माझ्यामध्ये वसत नाही.
19 चांगले करण्याची माझ्या ठायी इच्छा आहे, परंतु तसे मी करीत नाही, त्याऐवजी जे फार वाईट व जे मला करावेसे वाटत नाही तेच करतो.
20 आणि ज्याअर्थी, ज्या गोष्टी मला कराव्याशा वाटत नाहीत त्या मी करतो, तेव्हा खरे तर त्या गोष्टी मी करतो असे नाही तर माइयाठयी असणारे पाप त्या गोष्टी करते.
21 तर माइयामध्ये मला हा नियम आढळतो की, माइयातील मनुष्याला चांगले करावेसे वाटते पण वाईट ही एकच गोष्ट माझ्याबरोबर आहे.
22 माझ्या आत असलेला मनुष्य देवाच्या नियमशास्त्रामुळे आनंद करतो.
23 परंतु माझ्या अवयवात मला निराळाच नियम कार्य करताना दिसतो. तो माझ्या मनावर अमल करणाऱ्या नियमाबरोबर लढतो, आणि पापाने मजवर लादलेल्या नियमाचा, जो माझ्या शरीरात कार्य करतो, त्याचा कैदी करतो.
24 मी अत्यंत दु:खी मनुष्य आहे! मरणाधीन असलेल्या शरीरापासून मला कोण सोडवील?
25 परंतु आमचा प्रभु येशू ख्रिस्त याच्याद्वारे देवाचे आभार मानतो.तर मग माझ्या मनाने मी देवाच्या नियमाचा गुलाम आहे. पण माझ्या पापी स्वभावाने मी पापाने माझ्यावर लादलेल्या नियमाचा गुलाम आहे.