लूक

अध्याय : 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24


धडा 24

1 आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्या स्त्रिया अगदी पहाटेस कबरेकडे आल्या, आणि त्यांनी स्वत: तयार केलेले मसाले आणले.
2 त्यांना दगड कबरेवरुन लोटलेला आढळला.
3 त्या आत गेल्या, परंतु त्यांना प्रभु येशूचे शरीर सापडले नाही.
4 यामुळे त्या अवाक्‌ झाल्या असतानाच, अचानक लखलखीत कपडे घातलेले दोन पुरुष त्यांच्या बाजूला उभे राहिले.
5 अतिशय भयभीत होऊन त्यांनी आपले चेहरे जमिनीकडे वळविले. ते दोन पुरुष त्यांना म्हणाले, “जो जिवंत आहे त्याचा शोध तुम्ही मेलेल्यांमध्ये का करता?
6 तो येथे नाही; तो उठला आहे! तो गलीलात असताना त्याने तुम्हांला काय सांगितले याची आठवण करा.
7 तो असे म्हणाला की, मनुष्याच्या पुत्राला धरुन पापी लोकांच्या हाती द्यावे, त्याला वधस्तंभावर खिळावे आणि तिसऱ्या दिवशी त्याने उठावे.
8 नंतर स्त्रियांना येशूच्या शब्दाची आठवण झाली.
9 त्या कबरेपासून परतल्या आणि त्यांनी या सर्व गोष्टींचे वर्तमान अकरा प्रेषितांना व इतर सर्वांना सांगितले.
10 त्या स्त्रिया मरीया मग्दालिया, योहान्न, आणि याकोबाची आई मरीया ह्या होत्या. त्या आणि इतर स्त्रियांसुद्धा ज्या त्यांच्याबरोबर होत्या, प्रेषितांना या गोष्टी सांगत होत्या.
11 पण प्रेषितांना त्यांचे सांगणे मूर्खपणाचे वाटले. आणि त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही.
12 पण पेत्र उठला आणि कबरेकडे पळाला. त्याने खाली वाकून पाहिले पण त्याला तागाच्या गुंडाळण्याच्या वस्त्राशिवाय काही आढळले नाही. जे घडले त्याविषयी तो स्वत:शीच आश्चर्य करीत दूर गेला.
13 त्याचा दिवशी त्याच्यातील दोघे शिष्य यरुशलेमापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते.
14 ते एकमेकांशी या घडलेल्या सर्व गोष्टीविषयी बोलत होते.
15 ते बोलत असताना आणि या गोष्टींची चर्चा करीत असताना येशू स्वत: आला आणि त्यांच्याबरोबर चालू लागला.
16 पण त्यांचे डोळे त्याला ओळखण्यापासून बंद करण्यात आले होते.
17 येशू त्यांना म्हणाला, “चालत असताना तुम्ही एकमेकांबरोबर बोलत आहात त्या गोष्टी कोणत्या आहेत?”चालता चालता ते थांबले. ते अतिशय दु:खी दिसले.
18 त्यांच्यातील एकजण ज्याचे नाव क्लयपा होते, तो त्याला म्हणला, “ह्या दिवसांमध्ये घडलेल्या गोष्टी माहीत नसलेले असे यरुशलेमात राहणारे तुम्ही एकटेच आहात काय?”
19 येशू त्यांना म्हणाला, “तुमच्या मते कोणत्या गोष्टी?” ते त्याला म्हणाले, “नासरेथकर येशूविषयीच्या सर्व गोष्टी. हाच तो मनुष्य जो आपल्या कृत्यांनी आणि शब्दांनी देवासमोर आणि मनुष्यांसमोर एक महान संदेष्टा झाला.
20 आणि आम्ही चर्चा करीत होतो की, कसे आमच्या प्रमुख याजकांनी आणि अधिकाऱ्यांनी त्याला मरणदंड भोगण्यासाठी स्वाधीन केले. आणि त्यांनी त्याला वधस्तंभी खिळले.
21 आम्ही अशी आशा केली होती की, तोच एक आहे जो इस्राएलाची मुक्तता करील. आणि या सगळ्याशिवाय हे सर्व घडून गेलेल्या गोष्टीला आज तीन दिवस झालेत.
22 आणि आमच्या परिवारातील काही स्त्रियांनी आम्हांला थश्च केले आहे: आज अगदी पहाटे त्या कबरेकडे गेल्या, परंतु त्यांना त्याचे शरीर सापडले नाही.
23 त्यांनी येऊन आम्हांला सांगितले की, त्यांना देवदूतांचा दृष्टात घडला आणि देवदूतांनी सांगितले की, तो जिवंत आहे.
24 तेव्हा आमच्यातील काही कबरेकडे गेले, आणि स्त्रियांनी जसे सांगितले होते, तसेच त्यांना आढळले, पण त्यांनी त्याला पाहिले नाही.”
25 मग येशू त्यांना म्हणाला, “संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवण्यास तुम्ही अति मूर्ख आणि मंद आहात.
26 ख्रिस्तासाठी या सर्व गोष्टी सहन करणे आणि त्याच्या गौरवात जाणे आवश्यक नव्हते काय?”
27 आणि म्हणून त्याने मोशेपासून सुरुवात करुन आणि सर्व संदेष्ट्यापर्यंत सांगून, पवित्र शास्त्रात त्याच्याविषयी काय लिहिले आहे ते सर्व त्याने त्यांना स्पष्ट करुन सांगितले.
28 ज्या खेड्याकडे ते जात होते, त्याच्याजवळ ते आले आणि येशूने असा बहाणा केला की, जणू काय तो पुढे जाणार आहे.
29 परंतु जास्त आग्रह करुन ते म्हणाले, “आमच्या बरोबर राहा. कारण जवळजवळ संध्याकाळ झालीच आहे. आणि दिवसही जवळजवळ मावळला आहे.” मग तो त्यांच्याबरोबर राहावयास आत गेला.
30 जेव्हा तो त्यांच्याबोरबर जेवायला मेजासभोवती बसला, त्याने भाकर घेतली आणि उपकार मानले. नंतर त्याने ती मोडली व ती त्यांना तो देऊ लागला.
31 तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी त्याला ओळखले. पण तो त्यांच्यातून अदुश्य झाला.
32 मग ते एकमेकांना म्हणू लागले, “तो वाटेवर आपणाशी बोलत असताना व पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्ट करुन सांगत असताना आपली अंत:करणे आतल्या आत उकळत नव्हती काय?”
33 मग ते लगेच उठले, व यरुशलेमेस परत गेले. तेव्हा त्यांना अकरा प्रेषित व त्यांच्याबरोबर असलेले इतर एकत्र जमलेले आढळले.
34 प्रेषित आणि इतरजण म्हणाले, “खरोखर प्रभु उठला आहे! आणि शिमोनाला दिसला आहे.”
35 नंतर त्या दोन शिष्यांनी वाटेत काय घडले ते त्याला सांगितले आणि तो भाकर मोडत असताना त्यांनी त्याला कसे ओळखले ते सांगितले.
36 ते या गोष्टी त्यांना सांगत असतानाच येशू त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि त्यांस म्हणाला, “तुम्हांस शांति असो.”
37 ते दचकले आणि भयभीत झाले. त्यांना असे वाटले की, ते भूत पाहत आहेत.
38 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही असे अस्वस्थ का झालात? तुमच्या मनात शंका का निर्माण झाल्या?
39 माझे हात व पाय पाहा. तुम्हाला मी दिसतो तोच मी आहे. मला स्पर्श करा आणि पाहा की, मला आहे तसे हाडमांस भुताला नसते.
40 असे बोलून त्याने त्यांस आपले हातपाय दाखवले. तरीही त्यांच्या आनंदामुळे त्यांना ते खरे वाटेना.
41 ते आश्चर्यचकित झाले तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “येथे तुमच्याजवळ खाण्यासाठी काय आहे?”
42 खरे त्यांनी त्याला भाजलेला माशाचा तुकडा दिला.
43 त्याने तो घेतला व त्यांच्यासमोर खाल्ला.
44 तो त्यांना म्हणाला, “ह्याच त्या गोष्टी ज्या मी तुम्हांबरोबर असताना सांगितल्या होत्या की, मोशेचे नियमशास्त्र, भविष्यवादी आणि स्तोत्रे ह्यात माझ्याविषयी जे सांगितले आहे ते सर्व पूर्ण झालेच पाहिजे.”
45 नंतर पवित्र शास्त्र समजण्यासाठी त्याने त्यांची मने उघडली.
46 मग तो त्यांना म्हणाला, “असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दु:ख भोगावे आणि मेलेल्यांतून तिसऱ्या दिवशी उठावे.
47 आणि यरुशलेमापासून सुरुवात करुन सर्व राष्ट्रांस माझ्या पित्याने जे वचन दिले आहे ते पाठवीन. पापक्षमेसाठी पश्चात्तापाची घोषणा करावी.
48 या गोष्टींचे तुम्ही साक्षी आहात.
49 आता मी तुम्हांला माझ्या पित्याने जे वचन दिले आहे ते पाठविन. परंतु जोपर्यंत तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने भरले जात नाही तोपर्यंत तुम्ही या शहरातच राहा.”
50 नंतर तो त्यांना बाहेर दूरवर बेथानीपर्यंत घेऊन गेला आणि त्याने हात वर करुन आशीर्वाद दिला.
51 तो त्यांना आशीर्वाद देत असतानाच तो त्यांना सोडून गेला. आणि त्याला स्वर्गात घेण्यात आले.
52 नंतर त्यांनी त्याची उपासना केली व ते मोठ्या आनंदाने यरुशलेमाला परतले.
53 आणि देवाची सतत स्तुति करीत ते मंदिरात राहिले.