धडा 2
1 “मग तुमच्या भावांना ‘तुम्ही माझे आहात’ आणि बहिणींना ‘त्याने तुमच्यावर दया केली’ असे म्हणाल.”
2 “तुम्ही आपल्या आईशी वाद घाला. खुशाल वाद घाला.कारण ती माझी पत्नी नाही व मी तिचा पती नाही. वेश्येप्रमाणे वागण्याचे सोडून देण्यास तिला सांगा. तिच्या स्तनापासून तिला तिच्या प्रियकरांना दूर करण्यास सांगा.
3 तिने जर व्यभिचार करण्याचे सोडण्यास नकार दिला तर मी तिला नग्न करीन. तिला मी तिच्या जन्माच्या वेळच्या अवस्थेप्रमाणे टाकीन. मी तिचे लोक काढून घेईन मग ती ओसाड रूक्ष वाळवंटाप्रमाणे होईल, मी तिला तहानेने मारीन.
4 तिची मुले ही वेश्येची मुले असल्याने मला त्यांची कीव येणार नाही.
5 त्यांची आई वेश्येप्रमाणे वागली. तिला तिच्या कर्मांची लाज वाटली पाहिजे. ती म्हणाली, ‘मी माझ्या प्रियकराकडे जाईन ते मला अन्नपाणी देतील. ते मला लोकर, कापड, मद्या व जैतूनेचे तेल देतील.’
6 “म्हणून, मी (परमेश्वर) तुझा (इस्राएलचा) रस्ता काटे पसरवून आडवीन. मी भिंत बांधीन मग तिला मार्ग सापडू शकणार नाही.
7 ती तिच्या प्रियकरांमागून धावेल पण त्यांना ती गाठू शकणार नाही. ती तिच्या प्रियकरांना शोधील, पण ते तिला सापडणार नाहीत. मग ती म्हणेल, ‘मी माझ्या पहिल्या पतीकडे (परमेश्वराकडे) परत जाईन. मी त्याच्याजवळ असताना माझे जीवन ह्याहून चांगले होते आतापेक्षा ते आयुष्यच बरं होते.’
8 “तिला धान्य, मद्य आणि तेल देणारा मीच एकमेच (परमेश्वर) आहे, हे तिला (इस्राएलला) कळले नाही. मी तिला आणखी चांदी-सोने देत राहिलो पण इस्राएली लोकांनी त्या चांदी-सोन्याचा उपयोग बआलच्या मूर्ता घडविण्याकरिता केला.
9 म्हणून, मी (परमेश्वर) परत येईन. मी धान्य पिकताच माझे धान्य व द्राक्षे तयार होताच धान्य आणि द्राक्षरस परत घेईन. मी तिला तिचे उघडे शरीर झाकण्यासाठी दिलेली लोकर व कापड परत घेईन.
10 आता मी तिला उघडी करीन. ती नग्न होईल व तिचे सर्व प्रियकर तिला पाहू शकणार नाही.
11 मी तिचा सर्व आनंद नष्ट करीन. तिच्या सुट्या तिच्या अमावस्येच्या मेजवान्या व विश्रांतीचे दिवस मी काढून घेईन. तिच्या खास मेजवान्या मी बंद करीन.
12 मी तिच्या द्राक्षवेलींचा व तिच्या अंजिराच्या झाडांचा नाश करीन. ती म्हणाली होती, ‘माझ्या प्रियकरांनी मला या गोष्टी दिल्या’ पण मी तिच्या बागांचे रूप पालटून. त्या जंगलाप्रमाणे होतील. वन्या पशू येऊन झाडे खातील.
13 “तिने बालाची सेवा केली, म्हणून मी तिला शिक्षा करीन. तिने त्यांच्यापुढे धूप जाळला. तिने साजशृंगार केला. तिने दागदागिने व नथनी घातली मग ती तिच्या प्रियकरांकडे गेली व मला विसरली.” परमेश्वरच असे म्हणाला:
14 “म्हणून मी (परमेशवर) तिला शिकवीन. मी तिला वाळवंटात नेईन. मी तिच्याशी प्रेमाने बोलेन.
15 तेथे मी तिला द्राक्षमळे देईन अखोरची दरी आशेचे द्वार म्हणून देईन. मग तिच्या तरुणपणी मिसर देशातून बाहेर आल्यावर ज्याप्रमाणे तिने प्रत्युत्तर दिले होते, ती देईल.”
16 परमेश्वरच असे म्हणतो. “त्या वेळेला ‘तू मला माझ पती’ म्हणून संबोधशील. मला ‘माझा बआलअसे म्हणणार नाहीस.
17 मी तिच्या तोंडातून बालाचे नाव काढून टाकीन. मग लोक कधीही बालाचे नाव घेणार नाहीत.
18 “त्या वेळेला, मी इस्राएली लोकांसाठी रानातल्या प्राण्यांबरोबर, आकाशातील पक्ष्यांबरोबर आणि जमिनीवर सरपटणाव्या प्राण्यांबरोबर एक करार करीन. मी धनुष्य तलवार व युध्दात वापरण्यात येणारी शस्त्रे मोडून टाकीन. त्या देशात एकही शस्त्र राहणार नाही. मी देश सुरक्षित करीन, त्यामुळे इस्राएलचे लोक शांतीने झोप घेतील.
19 आणि मी (परमेश्वर) तुला माझी चिरंतन वधू करीन. मी चांगुलपणा, न्याय,प्रेम व दया यांच्यासह तुला वधू करून घेईन.
20 मी तुला माझी विश्वासू वधू बनवीन. मग तू परमेश्वराला खरोखर जाणशील.
21 मी त्या वेळेला प्रत्युत्तर देईन.” परमेश्वर असे म्हणतो. “मी आकाशाशी बोलेन व तो पृथ्वीवर पाऊस पाडील.
22 भूमी धान्य, मद्य व तेल देईल.त्यामुळे इज्रेलच्या गरजा भागतील.
23 तिच्या भूमीत मी तिचे पुष्कळ बीजपेरीन. लो-रूमाहावर मी दया करीन. लो-अम्मीला मी ‘माझे लोक’ म्हणीन. मग ते मला ‘तू माझा परमेश्वर’ मानतील.”