दानीएल

अध्याय : 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12


धडा 1

1 नबुखदनेस्सर हा बाबेलाचा राजा होता. नबुखद्नेस्सर यरुशलेमाला आला. आपल्या सैन्याच्या मदतीने त्याने यरुशलेमला वेढा घातला. यहूदाचा राजा यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षीहे घडले.
2 परमेशवरानेच नबुखद्नेस्सराच्याकरवी यहूदाचा राजा यहोयाकीम याचा पराभव केला. नबुखद्नेस्सरने देवाच्या मंदिरातील ताटल्या व इतर वस्तू नेल्या आणि बाबेलमधील त्याच्या मूर्तीच्या देवळात ठेवल्या.
3 नंतर नबुखदनेस्सर राजाने अश्पनजला हुकूम केला. (अश्पनज हा, राजाच्या सेवेत असणाऱ्या नपुंसक अधिकाऱ्यांतील सर्वांत महत्वाचा अधिकारी होता.) राजाने अश्पनजला, काही इस्राएली लोकांना त्याच्या राजवाड्यात आणण्यास सांगितले. नबुखद्नेस्सरला महत्वाच्या घराण्यातील आणि राजघराण्यातील इस्राएली लोक हवे होते.
4 राजाला,सुदृढ, तरुण, ज्यांच्या अंगावर जखमेची खूण वा व्रण नाही, ज्यांच्या शरीरांत काहीही दोष नाही असे यहूदी तरुण हवे होते. ते देखणे व चाणाक्ष असावेत अशी राजाची अपेक्षा होती. त्यांनी सहजतेने पण लवकर सर्व गोष्टी शिकून राजाची सेवा करावी, अशी राजाची इच्छा होती. अश्पनजला, इस्राएलच्या त्या तरुणांना, खास्दी भाषा व लेखन शिकविण्यास सांगितले होते.
5 राजा नबुखद्नेस्सर, त्या तरुणांना, तो स्वत: जे अन्न खाई तेच अन्न व मद्य, ठरावीक प्रमाणात रोज देत असे. इस्राएलच्या ह्या तरुणांनी तीन वर्षांत सर्व शिक्षण पूर्ण करावे, अशी राजाची इच्छा होती. मग ते राजाच्या सेवेत रूज व्हायचे होते.
6 दानीएल, हनन्या, मीशाएल व अजऱ्या असे ते चौघेजण होते. ते सर्व यहूदा वंशापैकी होते.
7 नंतर अश्पनाजने ह्या यहूदी तरुणांना बाबेलच्या लोकांच्या नावाप्रमाणे नावे दिली. ती अशी: दानीएलला बेल्टशस्सर, हनन्याला शद्रख, मीशाएलला मेशख, व अजऱ्याला अबेद्नगो.
8 दानीएलला राजाचे ते पौष्टिक अन्न व मद्य घेऊन, स्वत:ला अपवित्र करून घेण्याची अजिबात इच्छा नव्हती. म्हणून त्याने ह्यासाठी अश्पनजची परवानगी मागितली.
9 देवाने अश्पनजला दानीएलशी चांगले व दयेने वागण्याची बुध्दी दिली.
10 पण अश्पनज दानीएलला म्हणाला, मला, माझ्या स्वामी, राजाची भीती वाटते. तुम्हाला असे अन्न व पेय देण्याचा हुकूम राजाने दिला आहे. तुम्ही हे अन्न खाल्ले नाहीत तर तुम्ही अशक्त व आजारी दिसू लागाल, तुमच्याच वयाच्या इतर तरुणांपेक्षा तुम्ही वाईट दिसु लागाल. राजाने हे पाहिले. तर तो माझ्यावर रागावेल आणि माझे डोकेसुध्दा कदाचित् उडवेल. माझ्या मृत्यूला मग तुम्हीच कारणीभुत व्हाल.
11 अश्पनजने दानीएल, हनन्या, मीशाएल व अजऱ्या ह्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एका पहाकेऱ्याची नेमणूक केली होती. त्या पहारेकऱ्याबरोबर मग दानीएलचे बोलणे झाले.
12 दानीएल त्याला म्हणाला,”आम्हाला खाण्यास फक्त भाज्या व पिण्यास पाणी दे. असे तू दहा दिवस करून बघ.
13 दहा दिवसानंतर तू जे तरुण राजाने दिलेले अन्न खातात, त्यांच्याबरोबर आमची तुलना करून, कोण जास्त सुदृढ दिसतात, ते तुझे तूच ठरव. मग आम्हाला काय द्यायचे ह्याचा निर्णय तुझा तूच घे. आम्ही तुझे नोकर आहोत.”
14 तेव्हा पहारेकरी दानीएल, हनन्या, मीशाएल, व अजऱ्या व्या यांची चाचणी घ्यायला तयार झाला.
15 दहा दिवसानंतर पाहिले तर दानीएल व त्याच्या मित्रांची प्रकृती राजाचे पौष्टिक अन्न खाणाऱ्या इतर तरुणांपेक्षा निरोगी होती.
16 मग पहारेकऱ्याने, दानीएल, हनन्या, मीशाएल व अजऱ्या ह्यांना राजाने दिलेल्या खास अन्नाऐवजी भाज्या देण्याचाच परिपाठ ठेवला.
17 देवाने ह्या चौघांना सुज्ञपणा व निरनिराव्व्या प्रकारचे साहित्य व विज्ञान शिकण्याची क्षमता दिली होती. दानीएलला तर सर्व प्रकारच्या दृष्टांन्ताबद्दल व स्वप्नांबद्दल समजू शके.
18 सर्व तरुणांनी तीन वर्षांत शिकून तयार व्हावे, अशी राजाची इच्छा होती. राजाने ठरवून दिलेल्या कालावधीनंतर म्हणजे तीन वर्षांनंतर अश्पनजने सर्व तरुणांना नबुखद्नेस्सर राजापुढे उभे केले.
19 राजा त्यांच्याशी बोलल्यावर, त्याच्या लक्षात आले की दानीएल, हनन्या, मीशाएल व अजऱ्या ह्या चौघांएवढे कोणीही बुध्दिमान नाहीत. म्हणून ह्याच चौघांना राजाच्या पदरी ठेवले गेले.
20 जेव्हा जेव्हा राजाने त्यांना काही महत्वाचे विचारले, तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी त्यांचे ज्ञान व जाण दिसून आली. त्याच्या राज्यातील ज्ञानी माणसांपेक्षा वा मांत्रिकांपेक्षा हे दहापटीने हुशार आहेत, हे राजाच्या लक्षात आले.
21 म्हणून दानीएलला कोरेश राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षापर्यंत राजाच्या पदरी ठेवून घेण्यात आले.