धडा 3
1 खूप संकटे पाहिलेला मी एक माणूस आहे. परमेश्वराने आम्हाला काठीने मारताना मी प्रत्यक्ष पाहिले.
2 परमेश्वराने मला प्रकाशाकडे न नेता, अंधाराकडे नेले.
3 परमेश्वराने त्याचा हात माझ्याविरुध्द केला. दिवसभर, त्याने आपला हात, पुन्हा पुन्हा, माझ्याविरुद्ध चालविला.
4 त्यांने माझी त्वचा आणि मांस नष्ट केले आणि माझी हाडे मोडली.
5 परमेश्वराने माझ्याभोवती दु:ख व त्रास ह्यांच्या भिंती उभारल्या. त्यांने दु:ख व त्रास माझ्याभोवती उभे केले.
6 त्याने मला अंधकारात बसायला लावले. माझी स्थिती एखाद्या मृताप्रमाणे केली.
7 परमेश्वराने मला बंदिवान केल्यामुळे मी बाहेर येऊ शकलो नाही. त्याने मला मोठमोठ्या बेड्या घातल्या.
8 मी जेव्हा मदतीसाठी आक्रोश करतो, तेव्हासुध्दा परमेश्वर माझा धावा ऐकत नाही.
9 त्याने दगडधोड्यांनी माझ्या रस्त्यात अडथळा निर्माण केला आहे. त्याने माझा मार्ग वाकडा केला आहे.
10 परमेश्वर, माझ्यावर हल्ला करण्यासाठी टपून बसलेल्या, अस्वलासारखा आहे. लपून बसलेल्या सिंहासारखा तो आहे.
11 परमेश्वराने मला माझ्या मार्गावरुन दूर केले. माझे तुकडे तुकडे केले. माझा नाश केला.
12 त्याने त्याचे धनुष्य सज्ज केले. त्याने मला त्याच्या बाणांचे लक्ष्य बनविले.
13 त्याने माझ्या पोटात बाणाने मारले.
14 मी माझ्या माणसांमध्ये चेष्टेचा विषय झालो. सर्व दिवसभर, ते मला उद्देशून गाणी गातात व माझी टर्र उडवितात.
15 परमेश्वराने मला हे विष (शिक्षा) प्यायला दिले. हे कडू पेय त्याने मला भरपूर पाजले.
16 परमेश्वराने मला दाताने खडे फोडायला लावले. मला धुळीत लोटले.
17 मला पुन्हा कधीही शांती मिळणार नाही, असे मला वाटले. मी चांगल्या गोष्टी तर विसरलो.
18 मी मनाशी म्हणालो, “परमेश्वराच्या कृपेची मला मुळीच आशा नाही.”
19 परमेश्वरा, लक्षात ठेव. मी फार दु:खी आहे, व मला घर नाही. तू दिलेल्या कडू विषाचे (शिक्षेचे) स्मरण कर.
20 मला माझ्या सर्व त्रासांची आठवण आहे. म्हणूनच मी दु:खी आहे.
21 पण मी पुढील काही गोष्टींचा विचार केला की मला आशा वाटते.
22 परमेश्वराच्या प्रेम व दयेला अंत नाही. परमेश्वराची करुणा चिरंतन आहे.
23 ती प्रत्येक दिवशी नवीन, ताजी असते. परमेश्वरा, तुझी विश्वासार्हता महान आहे.
24 मी मनाशी म्हणतो, “परमेश्वर माझा देव आहे. म्हणूनच मला आशा वाटेल.”
25 परमेश्वराची वाट पाहणाऱ्यांवर व त्याला शोधणाऱ्यांवर तो कृपा करतो.
26 परमेश्वराने आपले रक्षण करावे म्हणून मुकाट्याने वाट पाहणे केव्हाही चांगले.
27 परमेश्वराचे जोखड वाहणे केव्हाही बरेच. ते तरूणपणापासून वाहणे तर फारच चांगले.
28 परमेश्वर त्याचे जोखड मानेवर ठेवत असताना माणसाने मुकाट्याने एकटे बसावे.
29 माणसाने परमेश्वरापुढे नतमस्तक व्हावे. कोणी सांगावे, अजूनही आशा असेल.
30 जो मणुष्य मारत असेल त्याला खुशाल गालात मारू द्यावे व तो अपमान सहन करूण घ्यावा.
31 परमेश्वर लोकांकडे कायमची पाठ फिरवित नाही, हे माणसाने लक्षात ठेवावे.
32 परमेश्वर जेव्हा शिक्षा करतो, तेव्हा तो दया पण दाखवितो. हा त्याचा दयाळूपणा त्याच्या जवळील महान प्रेम व थोर करुणा ह्यामुळे आहे.
33 लोकांना शिक्षा करण्याची देवाची इच्छा नसते. लोकांना दु:ख द्यायला त्याला आवडत नाही.
34 परमेश्वराला ह्या गोष्टी पसंत नाहीत. पृथ्वीवरील सर्व बंदिवानांना कोणीतरी पायाखाली तुडविणे, त्याला आवडत नाही.
35 एका माणसाने दुसऱ्याशी अन्यायाने वागणे त्याला पसंत नाही. पण काही लोक अशा वाईट गोष्टी सर्वश्रेष्ठ ईश्वारासमक्ष करतात.
36 एका व्यक्तिने दुसऱ्या व्यक्तिला फसविणे परमेश्वराला आवडत नाही. ह्या अशा गोष्टी परमेश्वराला अजिबात पसंत नाहीत.
37 परमेश्वराच्या आज्ञेशिवाय, कोणी काहीही बोलावे आणि ते घडून यावे असे होऊ शकत नाही.
38 सर्वश्रेष्ठ देवच इष्ट वा अनिष्ट घडण्याची आज्ञा देतो.
39 एखाद्याच्या पापांबद्दल परमेश्वराने त्याला शिक्षा केल्यास तो माणूस तक्रार करू शकत नाही.
40 आपण आपली कर्मे पाहू या आणि तपासू या व नंतर परमेश्वराकडे परत जाऊ या.
41 स्वर्गातील परमेश्वराकडे आपण आपले हृदय व हात उंचावू या.
42 आपण त्याला म्हणू या, “आम्ही पाप केले, आम्ही हट्टीपणा केला. म्हणूनच तू आम्हाला क्षमा केली नाहीस.
43 तू क्रोधाविष्ट झालास आमचा पाठलाग केलास आणि दया न दाखविता आम्हाला ठार केलेस.
44 कोणतीही प्रार्थना तुझ्यापर्यंत पोहोचू नये म्हणून तू स्वत:ला अभ्रांनी वेढून घेतलेस.
45 दुसऱ्या राष्ट्रांसमोर तू आम्हाला कचरा व धूळ ह्यासारखे केलेस.
46 आमचे सर्व शत्रू आम्हाला रागाने बोलतात.
47 आम्ही घाबरलो आहोत. आम्ही गर्तेत पडलो आहोत. आम्ही अतिशय जखमी झालो आहोत. आम्ही मोडून पडलो आहोत.”
48 माझ्या लोकांचा झालेला नाश पाहून मी रडते. माझ्या डोळयांना धारा लागल्या आहेत.
49 माझे डोळे गळतच राहतील, मी रडतच राहीन.
50 परमेश्वरा, तू आपली नजर खाली वळवून आमच्याकडे पाही पर्यंत मी रडतच राहीन. तू स्वर्गातून आमच्याकडे लक्ष देईपर्यंत मी शोक करीन.
51 माझ्या नगरातील सर्व मुलींची स्थिती पाहून माझे डोळे मला दु:खी करतात.
52 निष्कारण शत्रू बनलेल्या लोकांनी पाखरासारखी माझी शिकार केली आहे.
53 मी जिवंत असताना त्यांनी मला खड्ड्यात लोटले आणि माझ्यावर दगड टाकले.
54 माझ्या डोक्यावरुन पाणी गेले. मी मनाशी म्हणालो, “आता सर्व संपले.”
55 परमेश्रा मी तुझ्या नांवाने हाक मारली परमेश्वरा, खड्ड्यातून तुझ्या नांवाचा धावा केला.
56 तू माझा आवाज ऐकलास. तू तुझ्या कानावर हात ठेवले नाहीस. माझी सुटका करण्याचे तू नाकारले नाहीस.
57 मी धावा करताच तू आलास. तू मला म्हणालास, “घाबरू नकोस.”
58 परमेश्वरा, तू माझे रक्षण केलेस तू मला पुनर्जीवन दिलेस.
59 परमेश्वरा, तू माझा त्रास पाहिला आहेस. आता मला न्याय दे.
60 माझ्या शत्रूंनी मला कसे दुखविले आणि माझ्याविरुद्ध कसे कट रचले ते तू पाहिले आहेस.
61 त्या शत्रूंनी केलेला माझा अपमान आणि माझ्याविरुध्द आखलेले बेत तू. परमेश्वरा, ऐकले आहेस.
62 सर्व काळ, शंत्रूचे बोलणे व विचार माझ्या विरुध्द आहेत.
63 परमेश्वरा, बसता उठता ते माझी कशी खिल्ली उडवितातत ते पाहा.
64 परमेश्वरा, त्यांना योग्य ते फळ दे. त्यांच्या कार्मांची परत फेड कर.
65 त्यांचे मन कठोर कर. नंतर त्यांना शाप दे.
66 क्रोधाने त्यांचा पाठलाग कर व त्यांचा नाश कर. ह्या आकाशाखाली, परमेश्वरा, त्यांचा नाश कर.