धडा 28
1 यहूदाचा राजा सिद्कीया याच्या कारकिर्दींच्या चौथ्या वर्षाच्या पाचव्या महिन्यातहनन्या हा संदेष्टा माझ्याशी बोलला. हनन्या हा अज्जूरचा मुलगा होता. तो गिबोन गावचा रहिवासी होता. परमेश्वराच्या मंदिरात तो माझ्याशी बोलला. तेव्हा याजक व इतर सर्व लोक तेथे उपस्थित होते. हनन्या म्हणाला,
2 “सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव असे म्हणतो ‘यहूदाच्या लोकांच्या मानेवर बाबेलच्या राजाने ठेवलेले जोखड मी मोडीन.
3 दोन वर्षांच्या आत, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने परमेश्वराच्या मंदिरातून नेलेल्या वस्तू मी परत आणीन. नबुखद्नेस्सरने त्या वस्तू बाबेलमध्ये नेल्या आहेत. पण मी त्या यरुशलेमला परत आणीन.
4 यहूदाचा राजा यकन्या यालासुद्धा मी येथे परत आणीन. यकन्या यहोयाकीमचा मुलगा आहे. नबुखद्नेस्सरने यहूदातील ज्या लोकांना बळजबरीने घरे सोडून बाबेलला नेले, त्या सर्व लोकांनाही मी परत आणीन.’ हा परमेश्वराचा संदेश आहे. ‘अशा रीतीने बाबेलच्या राजाने यहूदाच्या लोकांवर लादलेले जोखड मी मोडीन.”‘
5 संदेष्टा हनन्याच्या ह्या वक्तव्यानंतर यिर्मया बोलला. ते परमेश्वराच्या मंदिरात उभे होते. याजक व सर्व लोक यिर्मयाचे बोलणे ऐकू शकत होते.
6 यिर्मया हनन्याला म्हणाला, ‘तथास्तु! (आमेन) परमेश्वर खरोखरच असे करो! परमेश्वर तुझा संदेश खरा करील, अशी मी आशा करतो. परमेश्वर खरोखरच त्याच्या मंदिरातील बाबेलला नेलेल्या वस्तू परत येथे आणो आणि बळजबरीने घरे सोडण्यास भाग पाडलेल्या लोकांना परमेश्वर येथे परत आणो!
7 “पण हनन्या, मला जे सर्व लोकांना सांगितले पाहिजे, ते तूही ऐक.
8 तू आणि मी संदेष्टा होण्याच्या खूप पूर्वी अनेक संदेष्टे होऊन गेले, हनन्या त्यांनी पुष्कळ देशांत आणि राज्यांत युद्ध, उपासमार आणि रोगराई येईल असे भाकीत केले.
9 पण जे संदेष्टे शांतीचा उपदेश करतात, ते खरोखरच परमेश्वराने पाठविलेले आहेत का, ते तपासून पाहिलेच पाहिजे. जर त्यांचा संदेश खरा ठरला, तर तो खरोखरच परमेश्वराने पाठविलेला संदेष्टा आहे हे लोकांना समजेल.”
10 यिर्मयाच्या मानेवर जोखड होते, ते याजक हनन्याने काढून टाकले, व तोडून टाकले.
11 मग सगळ्या लोकांना ऐकू जावे म्हणून हनन्या मोठ्याने म्हणाला, “परमेश्वर म्हणतो ‘ह्याप्रमाणेच मी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याचे जोखड तोडीन. त्याने ते जगातील सर्व राष्ट्रांच्या मानेवर ठेवले आहे. पण दोन वर्षांच्या आतच मी ते तोडून टाकीन.”हनन्या असे म्हणताच, यिर्मया मंदिरातून निघून गेला.
12 जेव्हा यिर्मयच्या मानेवरचे जोखड हनन्याने काढून तोडल्यानंतर यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला.
13 परमेश्वर यिर्मयाला म्हणाला, “हनन्याला जाऊन सांग ‘परमेश्वर असे म्हणतो की तू लाकडाचे जोखड तोडलेस. पण त्यांच्या जागी मी लोखंडाचे बनवीन.’
14 सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, ‘मी सर्व राष्ट्रांच्या मानेवर लोखंडाचे जोखड ठेवीन. बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याची त्यांनी सेवा करावी, म्हणून मी असे करीन. ते त्याचे गुलाम होतील. मी नबुखद्नेस्सरला वन्यपशूंवरही अंकुश ठेवायला लावीन.”‘
15 नंतर संदेष्टा यिर्मया संदेष्टा हनन्याला म्हणाला, “हनन्या! ऐक! परमेश्वराने तुला पाठविलेले नाही पण तू यहूदाच्या लोकांना लबाडीवर विश्वास ठेवावयास लावले.
16 म्हणून परमेश्वर म्हणतो, ‘हनन्या, लवकरच मी तुला ह्या जगातून उचलीन. ह्या वर्षी तू मरशील. का? कारण तू लोकांना परमेश्वराच्याविरुद्ध वागण्यास शिकविलेस.”
17 त्याच वर्षाच्या सातव्या महिन्यात हनन्या मेला.