गीतरत्न

अध्याय : 1 2 3 4 5 6 7 8


धडा 4

1 प्रिये, तू किती सुंदर आहेस! सखे, तू खूप सुंदर आहेस. तुझ्या बुरख्याआड तुझे डोळे कपोतासारखे दिसतात. तुझे केस लांब आणि गिलाद पर्वताच्या उतारावरुन धावत जाणाऱ्या मेंढ्यांच्या कळपाप्रमाणे हेलकावणारे आहेत.
2 तुझे दात तुकतीच आंघोळ करुन आलेल्या बकऱ्या सारखे आहेत. त्या सर्व जुळ्यांना जन्म देतात आणि त्यांच्या पैकी कुणीही आपले बाळ गमावलेले नाही.
3 तुझे ओठ लाल रंगाच्या रेशमाच्या धाग्याप्रमाणे आहेत. तुझे मुख सुंदर आहे. घुंगटाखाली तुझ्या कपाळाच्या दोन बाजू डाळिंबाच्या दोन फोडींप्रमाणे आहेत.
4 तुझी मान दाविदाच्या मनोऱ्याप्रमाणे बारीक आणि लांब आहे. त्या मनोऱ्यांच्या भिंती बलशाली सैनिकांच्या एक हजार ढालींनी शोभिंवंत केल्या होत्या.
5 तुझी वक्षस्थळे कमलपुष्पांत चरत असलेल्या जुळ्या हरिणश्रावकासारखी आहेत, मृगीच्या जुळ्या पाडसासारखी आहेत.
6 दिवस शेवटच्या घटका मोजत आहेत आणि सावल्या दूर पळत आहेत. तेवढ्या वेळात मी त्या गंधरसाच्या उदाच्या पर्वतावर जाईन.
7 प्रिये, तू सगळीच फार सुंदर आहेस. तुझ्यात कुठेही काहीही दोष नाही.
8 लबोनान मधून माझ्या वधू, तू माझ्याबरोबर ये. लबानोनमधून माझ्याबरोबर ये. अमानाच्या शिखरावरुन माझ्याबरोबर ये, सनीर व हर्मोन यांच्या शिखरावरुन माझ्याबरोबर ये. सिंहाच्या गुहेतून, चित्यांच्या पर्वतावरुन माझ्याबरोबर ये.
9 माझ्या प्रिये, माझ्या वधू, तू मला उद्दीपित बनवतेस. फक्त तुझ्या एका डोळ्याने, तुझ्या गळ्यातल्या हारातील एका रत्नाने तू माझे हृदय चोरले आहेस.
10 माझ्या प्रिये, माझ्या वधू तुझे, प्रेम फार सुंदर आहे. तुझे प्रेम द्राक्षारसापेक्षा चांगले आहे. तुझ्या अत्तराचा वास इतर सुगंधी द्रव्यापेक्षा चांगला आहे.
11 माझ्या वधू, तुझ्या ओठातून मध गळतो. तुझ्या जिभेखाली मध आणि दूध आहे. तुझ्या कपड्यांना अत्तरासारखा गोड सुवास आहे.
12 माझ्या प्रिये, माझ्या वधू, तू कुलुपबंद केलेल्या बागेसारखी शुध्द आहेस. तू बंदिस्त तळ्यासारखी, कारंज्यासारखी आहेस.
13 तुझे अवयव डाळिंबाने आणि इतर फळांनी सर्व प्रकारच्या सुगंधी पदार्थांनी, मेंदी,
14 जटामासी, केशर, वेखंड व दालचिनी इत्यादींनी भरलेल्या बागेसारखे आहेत. तुझे अवयव उदाची झाडे, गंधरस व अगरु व इतर सुगंधी झाडांनी भरलेल्या बागेसारखे आहेत.
15 तू बागेतल्या कारंज्यासाखी, ताज्या पाण्याच्या विहिरीसारखी, लबानोनच्या पर्वतावरुन वाहात जाणाऱ्या पाण्यासारखी आहेस.
16 उत्तरेकडच्या वाऱ्या, ऊठ! दक्षिणवाऱ्या ये, माझ्या बागेवरुन वाहा. तिचा गोड सुगंध सर्वत्र पसरव. माझ्या सख्याला त्याच्या बागेत प्रवेश करु दे आणि तिथली गोड फळे चाखू दे.