धडा 28
1 “लोकांना जेथून चांदी मिळते अशा खाणी असतात आणि लोक जेथे सोने वितळवतात आणि ते शुध्द करतात अशा जागा असतात.
2 लोक जमिनीतून लोखंड काढतात. दगडांमधून तांबे वितळवले जाते.
3 मजूर गुहेत दिवा नेतात. ते गुहेत अगदी खोलवर शोध घेतात. ते अगदी खोल अंधारात दगडांचा शोध घेतात.
4 ते अशुध्द धातूचा शोध घेत घेत अगदी खोलवर जातात. लोकांच्या राहाण्याच्या जागेपासून ते खूप लांबवर आणि खोलवर जातात. जिथे आजपर्यंत कोणीही गेला नसेल तिथे ते जातात. ते दोरीला लोंबकळत इतरांपेक्षा खूप खोल जातात.
5 वरच्या जमिनीत धान्य उगवते. परंतु जमिनीच्या खाली काही वेगळेच असते, धातू शुध्द असतो अगदी अग्नीत वितळवल्यासारखा.
6 जमिनीच्या खाली इंद्रनील मणी आणि शुध्द सोन्याचे दाणे असतात.
7 रानटी पक्ष्यांना भूपृष्ठाखालील वाटांविषयी काही माहिती नसते. कुठल्याही बहिरी ससाण्याने त्या अंधारवाटा पाहिलेल्या नसतात.
8 रानटी जनावरे त्या वाटांवरुन गेलेली नसतात. सिंहही त्या वाटेने गेलेला नसतो.
9 मजूर अगदी कठीण खडक खोदतात. ते मजूर डोंगर पोखरतात आणि त्यांना बोडके करतात.
10 मजूर खडकातून बोगदा खणतात आणि खडकातला खजिना बघतात.
11 पाणी अडवण्यासाठी मजूर धरण बांधतात. ते दडलेल्या वस्तू बाहेर प्रकाशात आणतात.
12 “पण माणसाला शहाणपण कुठे मिलेल? समजूतदारपणा शोधण्यासाठी आपल्याला कुठे जावे लागेल?
13 शहाणपण किती मोलाचे आहे ते आपल्याला कळत नाही. पृथ्वीवरचे लोक जमीन खणून शहाणपण शोधू शकत नाहीत.
14 महासागर म्हणतो, ‘माझ्याजवळ शहाणपण नाही.’ सागर म्हणतो, ‘माझ्याजवळीही ते नाही.’
15 तुम्ही शुध्द सोने देऊन शहाणपण विकत घेऊ शकत नाही. ते विकत घेण्यासाठी जगात तेवढी चांदी नाही.
16 तुम्ही ओफिरच्या सोन्याने किंवा मौल्यवान शोहमच्या खड्याने वा नीलमण्याने शहाणपण विकत घेऊ शकत नाही.
17 शहाणपण सोन्यापेक्षा किंवा स्फटिकापेक्षा मौल्यवान असते. सोन्यात जडवलेले मौल्यवान खडेही शहाणपण विकत घेऊ शकत नाही.
18 शहाणपण पोवळ्यापेक्षा वा स्फटिकापेक्षाही मौल्यवान आहे. माणकापेक्षा ही त्याचे मोल अधिक आहे.
19 इथिओपियातले पीत स्फटिक शहाणपणापेक्षा अधिक मौल्यवान नाहीत. शुध्द सोन्याने तुम्ही तो विकत घेऊ शकत नाही.
20 “मग शहाणपणा कुठून येतो? समजूतदारपणा आपल्याला कुठे मिळेल?
21 पृथ्वीवरील सर्व जिवंत प्राण्यापासून शहाणपण लपवून ठेवले आहे. आकाशातले पक्षीसुध्दा ते बघू शकत नाहीत.
22 मृत्यू आणि विनाशम्हणतात, ‘आम्हाला शहाणपण सापडले नाही. आम्ही त्याबद्दलच्या फक्त अफवाच ऐकल्या आहेत.’
23 “फक्त देवालाच शहाणपणाकडे नेणारा मार्ग माहीत आहे. फक्त देवालाच तो कुठे आहे ते माहीत आहे.
24 देवाला पृथ्वीचे अगदी शेवटचे टोकसुध्दा दिसू शकते. त्याला आकाशाखालचे सर्व काही दिसते.
25 देवाने वाऱ्याला त्यांची शक्ती दिली. सागराला किती मोठे करायचे ते त्यानेच ठरवले.
26 पावसाला कोठे पाठवायचे ते त्यानेच ठरवले आणि वादळाने कुठे जायचे तेही त्यानेच ठरवले.
27 त्याच वेळी देवाला शहाणपण दिसले आणि त्याने त्याचा विचार केला. शहाणपणाचे मूल्य किती आहे ते त्याने जोखले आणि त्या शहाणपणाला संमती दिली.
28 आणि देव लोकांना म्हणाला, “परमेश्वराची भीती बाळगा व त्याला मान द्या तेच शहाणपण आहे. वाईट गोष्टी करु नका तोच समजूतदारपणा आहे.”