धडा 4
1 शलमोनाने वेदी पितळेची केली. ती 30 फूटलांब, 30 फूट रुंद आणि 81 फूट उंच होती.
2 त्याने ओतीव पितळेचे एक गंगाळदेखील केले. हे गोल असून त्याचा व्यास 10 हात होता. त्याची उंची 5 हात आणि त्याचा कडेचा परीघ 30 हात होता.
3 या गंगाळाच्या खालच्या बाजूस सभोवार कडेला बैलांच्या चित्रकृती घडवलेल्या होत्या. त्यांची लांबी 10 हात होती. गंगाळ बनवतानाच या बैलांच्या दोन रांगा ओतल्या होता.
4 बारा घडीव बैलांनी हे प्रशस्त गंगाळ तोललेले होते. तीन बैल पूर्वभिमुख, तीन पश्चिमाभिमुख, तीन उत्तराभिमुख तर तीन दक्षिणाभिमुख होते. आणि गंगाळ त्यांच्यावर होते. सर्व बैलांचा मागील भाग एकमेकांकडे आणि मध्यभागी आलेला होता.
5 या पितळी गंगाळाची जाडी 3 इंच होती. त्याची कड उमललेल्या कमलपुष्पासारखी होती. त्यात 17,500 गँलन पाणी मावू शकत असे.
6 याखेरीज शलमोनाने दहा तस्ते बनवली. ती त्याने या गंगाळाच्या उजव्या बाजूला पाच आणि डाव्या बाजूला पाच अशी बसवली. होमार्पणात वाहायच्या वस्तू धुवून घेण्यासाठी ही दहा तस्ते होती. पण मुख्य पितळी गंगाळ मात्र याजकांच्या वापरासाठी, होमार्पणाच्या वस्तू वाहण्यापूर्वी धुण्यासाठी होते.
7 शलमोनाने सोन्याच्या दहा दीपवृक्षही केले. हे त्याने त्यांचे विधीनुसार बनविले, आणि मंदिरात ठेवले. डावीकडे पाच आणि उजवीकडे पाच असे ते ठेवले.
8 दहा मेजेही शलमोनाने मंदिरात ठेवली. ती ही पाच डावीकडे आणि पाच उजवीकडे अशी ठेवली. शिवाय सोन्याचे शंभर वाडगे केले.
9 याखेरीज शलमोनाने याजकांसाठी एक आवार केले, एक प्रशस्त आवार आणि त्यांना दरवाजे केले. आवारांत उघडणारे दरवाजे मढवण्यासाठी पितळ वापरले.
10 एवढे झाल्यावर आग्नेयला मंदिराच्या उजवीकडे त्याने ते मोठे पितळी गंगाळ ठेवले.
11 हिराम या कारागिराने हंडे, फावडी व वाडगे बनवले. शलमोनासाठी जे देवाच्या मंदिराचे काम त्याला करायचे होते ते त्याने पूर्ण केले.
12 दोन स्तंभ, स्तंभावरचे कळस, त्यावरील जाळ्यांची दोन सुशोभने हे काम हिरामने केले होते.
13 त्या जाळीदार आच्छादनांवरील चारशे शोभिवंत डाळिंबे हिरामनेच केली होती. प्रत्येक जाळीवर डाळिंबांच्या दोन रांगा होत्या. स्तंभांवरचे कळस या जाळ्यांनी आच्छादलेले होते.
14 तिवया आणि तिवयांवरची गंगाळी त्याने घडवली होती.
15 मोठे पितळी गंगाळ आणि त्याला आधार देणारे बारा बैल हिरामनेच केले.
16 शलमोनासाठी त्याने हंडे, फावडी, काटे इत्यादी मंदिरातली उपकरणे केली. त्यासाठी लखलखीत, उजळ पितळ वापरलेले होते.
17 या सर्व गोष्टीसाठी शलमोनाने आधी चिकणमातीचे नमुने बनविले. त्यासाठी सुक्कोथ आणि सरेदा यांच्यामधली, यार्देन खोऱ्यातली माती वापरली.
18 शलमोनाने इतक्या अगणित गोष्टी करवून घेतल्या की त्यांना पितळ किती लागले याची मोजदाद कोणी केली नाही.
19 याखेरीज आणखी काही गोष्टी शलमोनाने देवाच्या मंदिरासाठी केल्या. सोन्याची वेदी, समर्पित भाकर ठेवण्याची मेजे केली.
20 सोन्याचे दीपवृक्ष आणि दिवे करवून घेतले. आतल्या सर्वांत पवित्र गाभाऱ्याच्या समोर योजना केल्याप्रमाणे लावण्यासाठी हे दिवे होते.
21 याशिवाय फुले, दिवे आणि निखारे उचलण्याचे चिमटे शुध्द सोन्याचे होते.
22 कातऱ्या, वाडगे, कटोरे, अग्रिपात्रे, या गोष्टीही शलमोनाने सोन्यात घडवल्या. मंदिराची दारे, अत्यंत पवित्र गाभाऱ्यातली दारे, आणि मुख्य दालनाचे दरवाजे हे ही सोन्याचे होते.