धडा 9
1 शलमोनाच्या मनात होते त्याप्रमाणे त्याने परमेश्वराचे मंदिर आणि महाल यांचे काम पूर्ण केले.
2 यापूर्वी गिबोनमध्ये परमेश्वराने शलमोनाला दर्शन दिले होते. त्याप्रमाणे पुन्हा दुसऱ्यांदा परमेश्वराने त्याला दर्शन दिले.
3 परमेश्वर त्याला म्हणाला, “मी तुझी प्रार्थना ऐकली. तू मला केलेली विनंती ऐकली. तू हे मंदिर बांधलेस. मी आता ते स्थान पवित्र केले आहे. येथे माझा निरंतर सन्मान होत राहील. हे स्थान माझ्या ध्यानीमनी राहील.
4 तुझे वडील दावीद यांच्या प्रमाणेच तू तुझी वर्तणूक ठेव. ते न्यायी आणि प्रामाणिक होते. तूही माझ्या आज्ञा पाळ, मी सांगितलेले सर्व करत राहा.
5 “तू त्याप्रमाणे वागलास तर तुमच्या घराण्यातील व्यक्तीच नेहमी राजासनावर येईल. तुझ्या वडीलांना मी तसे वचन दिले होते. त्यांच्या वंशजांचीच सत्ता इस्राएलवर राहील असे मी म्हटले होते.
6 “पण तू किंवा तुझी मुलेबाळे यांचा मार्ग भरकटला, माझ्या आज्ञांचे पालन झाले नाही, तुम्ही इतर दैवतांच्या भजनी लागलात तर मात्र मीच दिलेल्या या भूमीतून इस्राएलांना मी हुसकावून लावीन. इतर लोक तुमच्याकडे कुचेष्टेने बोट दाखवतील. तुमची टर उडवतील. मंदिर मी पवित्र केले आहे. येथे येऊन लोक माझे आदराने स्मरण करतील. पण माझे आज्ञापालन केले नाहीत तर ते मी जमीनदोस्त करीन.
7
8 हे मंदिर नामशेष होईल. ते पाहणारे स्तंभित होतील आणि म्हणतील, ‘परमेश्वराने या देशाचा आणि या मंदिराचा असा विध्वंस का बरे केला?’
9 यावर इतर जण सांगतील, ‘याला कारण या लोकांनी परमेश्वर देवाच्या त्याग केला. परमेश्वराने यांच्या पूर्वजांना मिसरमधून सोडवले. पण या लोकांनी इतर देव आपलेसे केले. त्या दैवतांच्या हे भजनी लागले. म्हणून परमेश्वराने हे अरिष्ट त्यांच्यावर आणले.”‘
10 परमेश्वराचे मंदिर आणि महाल यांचे बांधकाम पूर्ण होण्यास राजा शलमोनाला वीस वर्षे लागली.
11 त्यानंतर शलमोनाने सोराचा (तायर) राजा हिराम याला गालील प्रांतातील वीस नगरे दिली. कारण हिरामने मंदिर व राजमहाल या दोन्हीच्या बांधकामांमध्ये शलमोनला खूपच मदत केली होती. देवदार, गंधसरुचे लाकूड तसेच सोनेही हिरामने शलमोनाला लागेल तसे पुरवले होते.
12 हिराम मग सोराहून (तायर) ही नगरे पाहण्यासाठी म्हणून आला. पण त्याला ती तितकीशी पसंत पडली नाहीत.
13 राजा हिराम म्हणाला, “काय ही तू दिलेली नगरे?” या भूभागाला हिरामने काबूल प्रांत असे नाव दिले. आजही तो भाग काबूल म्हणूनच ओळखला जातो.
14 हिरामने शलमोनाला मंदिराच्या बांधकामासाठी नऊहजार पौंड सोने पाठवले होते.
15 शलमोनराजाने मंदिर आणि महाल यांच्या बांधकामासाठी वेठबिगारीवर मजूर लावले होते. त्यांच्याकडून राजाने आणखीही वास्तू बांधून घेतल्या. मिल्लो, यरुशलेमभोवतीचा कोट तसेच हासोर, मगिद्दो व गेजेर या नगरांची पुनर्बांधणी त्याने करवून घेतली.
16 मिसरच्या राजाने पूर्वी गेजेर हे शहर युध्दात घेऊन मग ते जाळून टाकले होते. तेथे राहणाऱ्या कनानीं लोकांना त्याने ठार केले होते. या फारोच्या मुलीशी शलमोनाने लग्न केले होते. तेव्हा फाराने हे नगरही शलमोनाला लग्नातील आहेरादाखल दिले होते.
17 शलमोनाने ते पुन्हा बांधून काढले. तसेच खालचे बेथ-होरोनही बांधले.
18 तसेच बालाथ, तामार ही वाळवंटातील नगरे,
19 अन्नधान्य आणि इतर वस्तूंची गोदामे, त्याचे रथ आणि घोडे यांच्यासाठी वेगळ्या जागा बांधल्या. यरुशलेममध्ये, लबानोनमध्ये आणि आपल्या अधिपत्याखालील इतर प्रदेशात जे जे त्याला हवे ते ते बांधले.
20 इस्राएल लोकांखेरीज त्या प्रदेशात अमोरी, हित्ती, परिज्जी, हिव्वी, यबूसी हेही लोक होते.
21 इस्राएल लोकांना त्यांचा पाडाव करता आलेला नव्हता. पण शलमोनाने त्यांना आपले गुलाम केले. आजही त्यांची स्थिती तशीच आहे.
22 इस्राएल लोकांना मात्र शलमोनाने आपले गुलाम केले नाही. इस्राएली लोक सैनिक, सरकारी अधिकाही, कारभारी, सरदार, रथधिपती आणि चालक अशा पदांवर होते.
23 शलमोनाने हाती घेतलेल्या कामांवर साडेपाचशे अधीक्षक होते. मजूरांवर ते देखरेख करीत.
24 फारोची मुलगी आपला महाल पूर्ण झाल्यावर दावीद नगरातून तेथे राहायला गेली. नंतर शलमोनाने मिल्लो बांधले.
25 शलमोन वर्षातून तीनदा वेदीवर होमबली आणि शांतीबली अर्पण करीत असे. ही वेदी त्याने परमेश्वरासाठी बांधली होती. तो परमेश्वरापुढे धूपही जाळी. तसेच मंदिरासाठी लागणाऱ्या वस्तू पुरवत असे.
26 एसयोन गेबेर येथे शलमोनाने गलबतेही बांधली. हे नगर अदोम देशात तांबड्या समुद्राच्या काठी एलोथजवळ आहे.
27 समुद्राबद्दल चांगली जाण असलेले लोक राजा हिरामच्या पदरी होते. हे खलाशी बरेचदा समुद्रावर जात. हिरामने त्यांना शलमोनाच्या आरमारात, शलमोनाच्या खलाशयांबरोबर पाठवले.
28 शलमोनाची गलबते ओफिर येथे गेली आणि त्यांनी तेथून एकतीसहजार पाचशे पौंड सोने शलमोनाकडे आणले.