2 शमुवेल

अध्याय : 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24


धडा 3

1 दावीद आणि शौल यांच्या घराण्यांमध्ये दीर्घकाळ युध्द चालू राहिले. दिवसेंदिवस दावीदाची ताकद वाढत चालली तर शौलचे घराणे कमकुवत बनत गेले.
2 हेब्रोन येथे दावीदाला मुलगे झाले, त्यांचा क्रम असा इज्रेलची अहीनवाम हिच्यापासून पाहिला मुलगा झाला तो अम्मोन.
3 दुसरा मुलगा किलाब, हा कर्मेलची नाबालची विधवा अबीगईल हिचा मुलगा. अबशालोम तिसरा, गशूरचा राजा तलमय याची मुलगी माका ही याची आई.
4 अदोनीया चवथा, हग्गीथ ही त्याची आई. शफाट्या पाचवा, त्याची आई अबीटल.
5 दावीदाची बायको एग्ला हिच्यापासून सहावा इथ्राम झाला. हेब्रोनमध्ये जन्मलेले हे त्याचे सहा पुत्र.
6 शौल आणि दावीद यांच्या घराण्यात चाललेल्या लढायांमध्ये शौलाच्या सैन्यातील अबनेरचे बळ वाढत चालले.
7 शौलची रिस्पा नामक उपपत्नी होती. ती अय्याची मुलगी. ईश-बोशेथ अबनेरला म्हणाला, “माझ्या वडिलांच्या दासीशी तू शरीर संबध का ठेवतोस?”
8 या बोलण्याचा अबनेरला संताप आला. तो म्हणाला, “शौलशी आणि त्याच्या घराण्याशी मी एकनिष्ठ राहिलेलो आहे. दावीदाच्या हातून मी तुमचा पराभव होऊ दिला नाही. मी विश्वासघात केला नाही.पण आता तू मला या बाईच्या संदर्भात दूषण देत आहेस.
9 आता मात्र मी निर्धाराने सांगतो की, देवाने भाकित केल्याप्रमाणे सर्व घडेल. शौलाच्या घराण्याकडून राज्य काढून घेऊन ते दावीदाकडे सोपवण्याचे भाकित परमेश्वराने केले आहे. परमेश्वर दावीदाला इस्राएल आणि यहूदा यांचा राजा करणार आहे. दानपासून बैर-शेब्यापर्यंत त्याचे राज्य असेल. माझ्या हातून आता हे सर्व प्रत्यक्षात आले नाही तर देव खुशाल माझे वाईट करो.”
10
11 ईश-बोशेथ हे ऐकून इतका घाबरला की त्याने काहीही प्रत्युत्तर केले नाही.
12 अबनेरने दूतांकरवी दावीदाला निरोप पाठवला, “ह्या प्रदेशांवर कोणी राज्य करावे असे तुला वाटते? माझ्याशबरोबर करार कर. म्हणजे इस्राएलचा राजा म्हणून तुला मान्यता मिळवून द्यायला मी मदत करीन.”
13 यावर दावीद म्हणाला, “हे छान झाले, मी करार करायला तयार आहे. आता माझे एक मागणे आहे. शौलची मुलगी मीखल हिला आपल्याबरोबर आणलेस तरच मी तुला भेटीन.”
14 शौलचा मुलगा ईश-बोशेथ याच्याकडे दावीदाने जासूदांकरवी निरोप पाठवला, “माझी पत्नी मीखल हिला माझ्याकडे पाठवून द्यावे. ती मला देण्यात आलेली आहे. तिच्या प्राप्तीसाठी मी शंभर पलिष्ट्यांचा वध केला होता.”
15 तेव्हा ईश-बोशेथने लईशचा मुलगा पालटीयेल याच्याकडून मीखलला आणण्यास माणसे पाठवली.
16 पालटीयेल हा मीखलचा नवरा. तो तिच्यामागोमाग बहूरीम पर्यंत रडतरडत गेला. पण अबनेरने त्याला परत जाण्यास सांगितले तेव्हा तो मागे फिरला.
17 अबनेरने इस्राएलाच्या वडीलधाऱ्या मंडळीकडे निरोप पाठवला, “दावीदाला राजा करावे असे तुमच्या मनात होते.
18 आता ते प्रत्यक्षात आणा. परमेश्वराने दावीद विषयी म्हटले आहे “पलिष्टी लोक आणि इतर शत्रू यांच्यापासून मी माझ्या इस्राएल लोकांचे संरक्षण करीन. माझा सेवक दावीद याच्यामार्फत मी हे करीन.”’
19 अबनेरने हे सर्व हेब्रोन येथे दावीदाच्या कानावर घातले. बन्यामीन घराण्यातील लोकांशीही तो या विषयी बोलला. त्यांना आणि इस्राएल लोकांना ते चांगले वाटले.
20 एवढे झाल्यावर तो आपल्या बरोबर वीस जणांना घेऊन हेब्रोन येथे दावीदाकडे आला. दावीदाने अबनेर आणि त्याच्या बरोबरचे हे सर्वलोक यांना मेजवानी दिली.
21 अबनेर दावीदाला म्हणाला, “महाराज, सर्व इस्राएल लोकांना मी आता आपल्या पायाशी एकत्र आणतो. ते तुमच्याशी करार करतील. मग आपल्या इच्छेप्रमाणे तुम्ही इस्राएलवर राज्य कराल.”तेव्हा दावीदाने अबनेरला निरोप दिला. अबनेर शांततेने परत गेला.
22 इकडे यवाब आणि दावीदाचे लोक युध्दावरुन परत आले. त्यांनी शत्रूकडून बऱ्याच मौल्यवान वस्तू लुटून आणल्या. दावीदाने निरोप दिल्यावर अबनेर नुकताच शांतचिताने तेथून गेला होता. तेव्हा हेब्रोन येथे दावीदाजवळ तो अर्थातच नव्हता.
23 यवाब सर्वसैन्यासह हेब्रोन येथे आला. सैन्यातील लोक यवाबाला म्हणाले, “नेरचा मुलगा अबनेर दावीदराजाकडे आलेला होता आणि दावीदाने त्याला शांत मनाने जाऊ दिले होते.”
24 तेव्हा यवाब राजाकडे आला आणि म्हणाला, “हे आपण काय केलेत? अबनेर येथे आलेला असताना तुम्ही त्याला तसेच जाऊ दिलेत! असे का?
25 या नेरच्या मुलाला तुम्ही ओळखताच. त्याचा यात कावा आहे. तो येथील बित्तंबातमी काढायला आला होता.”
26 मग दावीदाकडून निघून यवाबाने आपले दूत अबनेरच्या मागावर पाठवले. त्यांनी त्याला सिरा विहिरीजवळ गाठले आणि परत आणले. दावीदाला याची काहीच कल्पना नव्हती.
27 हेब्रोन येथे त्याला आणल्यावर यवाबाने त्याला गुप्त मसलत करण्यासाठी म्हणून वेशीच्या आत घेतले आणि अबनेरच्या पोटात वार केला. अबनेर गतप्राण झाला. यवाबाचा भाऊ असाएल याला अबनेरने मारले होते त्याचा यवाबाने सूड उगवला.
28 दावीदाला हे वृत्त समजले तेव्हा तो म्हणाला, “नेरचा मुलगा अबनेर याच्या खुनाच्या बाबतीत मी आणि माझे राज्य निर्दोष आहोत. परमेश्वर हे जाणतो.
29 यवाब आणि त्याचे कुटुंबीय या कृत्याला जबाबदार आहेत. तेव्हा अपराधी ते आहेत. (याचे फळ त्यांना भोगावे लागेल) त्याच्या वंशातील लोक महारोग, पंगुत्व यांनी ग्रासले जातील, युध्दात मारले जातील. त्याची अन्नान्नदशा होईल.”
30 गिबोनच्या लढाईत अबनेरने असाएलला मारले. आपल्या भावाच्या वधाचे प्रत्युत्तर म्हणून यवाब आणि अबीशय यांनी अबनेरला मारले.
31 दावीदाने यवाब व त्याच्या बरोबरचे सर्व लोक यांना सांगितले, “तुमची ही वस्त्रे फाडा आणि शोक झाला असल्याचे दाखवणारी वस्त्रे घाला. अबनेरच्या मृत्युबद्दल दु:ख व्यक्त करा.” त्यांनी हेब्रोन येथे अबनेरचे दफन केले. दावीद अत्यंविधीला हजर होता. अबनेरच्या कबरीपाशी राजा आणि इतर सर्व जण यांनी विलाप केला.
32
33 तेथे दावीद राजाने हे शोकगीत म्हटले“एखाद्या मूढ गुन्हेगाराप्रमाणे अबनेर मेला, नाही का?
34 अबनेर, अरे, तुझ्या हातात बेड्या नव्हत्या, पाय साखळदंडांनी बांधले नव्हते नाही रे, तुला कपटी लोकांनी मारले.”मग पुन्हा सर्वांनी अबनेरसाठी शोक व्यक्त केला.
35 दावीदाने काही तरी खाऊन घ्यावे म्हणून दिवसभर लोकांनी त्याची मनधरणी केली. पण दावीदाने एक निर्धार केला होता. “सूर्यास्तापूर्वी मी भाकर किंवा तत्सम काहीही खाल्ले तरी देव मला शासन करो, मला संकटात टाको “असे तो बोलला होता.”
36 लोकांनी हे सर्व पाहिले आणि दावीद राजाची वर्तणूक पाहून त्यांना आनंद झाला.
37 दावीदाने अबनेरला मारलेले नाही याबद्दल यहूदा आणि इस्राएल लोकांची खात्री पटली.
38 दावीद राजा आपल्या सेवकांना म्हणाला, “आज एक महत्वाचा पुढारी इस्राएलमध्ये मारला गेला हे तुम्ही जाणताच.
39 त्याच दिवशी राजा म्हणून माझा राज्याभिषेक झाला. सरुवेच्या मुलांचे हे वर्तन मला फार त्रासदायक झाले आहे. परमेश्वर त्यांच्या गुन्ह्याबद्दल त्यांना तसेच शासन करो.”