1 शमुवेल 1

अध्याय : 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31


धडा 29

1 पलिष्ट्यांनी आपल्या सर्व सैन्याला अफेक येथे एकत्र आणले. इज्रेल येथे एका झऱ्याजवळ इस्राएलांनी छावणी टाकली.
2 आपल्या शंभर शंभर आणि हजार हजार माणसांच्या समूहा बरोबर पलिष्टी अधिकारी चालले होते. दावीद आणि त्याची माणसे आखीश बरोबर पिझाडीला होती.
3 तेव्हा पलिष्ट्यांच्या सरदारांनी विचारले, “या इब्रींचे येथे काय काम?” आखीशने त्यांना सांगितले, “हा दावीद हा शौलच्या अधिकाऱ्यांपैकी एक होता. आता माझ्या बरोबर तो बराच काळ आहे. शौलला सोडून तो येथे आल्यापासून त्याच्यात मला काही वावगे आढळले नाही.”
4 पण त्या सरदारांना आखीशचा फार राग आला. ते म्हणाले, “या दावीदला परत पाठवा. त्याला दिलेल्या नगरात त्याने परत जावे. आमच्या बरोबर तो युध्दावर येता कामा नये. तो इथे राहिला तर शत्रूलाच आपल्या छावणीत घेतल्यासारखे होईल. आपली माणसे मारुन तो त्यांच्या राजाला, शौलला, खूश ठेवील.
5 शौलने हजार शत्रू मारले, तर या दावीदाने लाखोंचा वध केला असे एक गाणे गात इस्राएल लोक जल्लोष करतात तोच हा दावीद.
6 तेव्हा आखीश दावीदला बोलावून म्हणाला, “परमेश्वराच्या जीविताची शपथ, तू माझ्याशी सचोटीने वागला आहेस. माझ्या सैन्यात तुला भरती करुन घेणे मला आवडले असते. तू मला सामील झाल्यापासून मला तुझ्यात आक्षेपाई काही आढळले नाही. पण पलिष्टी अधिकाऱ्यांचे तुझ्याबद्दल चांगले मत नाही.
7 तेव्हा तू शांतपणे माघारी फीर. पलिष्टी अधिकाऱ्यांना काहीही उपद्रव देऊ नको.”
8 तेव्हा दावीदाने विचारले, “माझे काय चुकले? मी तुमच्याकडे आलो त्या दिवसापासून आजतागायत माझ्यात तुम्हाला काही दोषास्पद आढळले का? माझे स्वामी महाराज यांच्या शत्रूंचा मुकाबला मी का करु नये?’
9 आखीशने त्याला सांगितले, “मला तू आवडतोस. तू देवाने पाठवलेल्या दूतासारखाच आहेस. पण दावीदाने आमच्या बरोबर युध्दावर येऊ नये असे पलिष्टी सरदारांचे म्हणणे आहे.
10 उद्या सकाळी लौकर उठून तू आणि तुझ्या बरोबरची माणसे परत जा. तुम्हाला दिलेल्या नगरात जा. या सरदारांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष कर. तू भला माणूस आहेस उद्या उजाडताच निघून जा.”
11 तेव्हा दावीद आपल्या बरोबरच्या लोकांसह पहाटेच पलिष्ट्यांच्या देशात परतला आणि पलिष्ट्यांनी इज्रेलवर चढाई केली.