धडा 24
1 यहोशवाने इस्राएल लोकांच्या सर्व वंशांना शखेम येथे एकत्र बोलावले. इस्राएलीं पैकी वडीलधारी मंडळी, न्यायाधीश, प्रमुख, अधिकारी या सर्वांना पुढे बोलावले. ही मंडळी परमेश्वरासमोर उभी राहिली.
2 मग यहोशवा सर्वांशी बोलला. तो म्हणाला, “इस्राएलच्या परमेश्वर देवाचे तुम्हाला काय सांगणे आहे ते आता मी तुम्हाला कळवतो.फार पूर्वी तुमचे पूर्वज फरात नदीच्या पलीकडे राहात होते. अब्राहाम आणि नाहोर यांचा बाप तेरह याच्या काळातील लोकांविषयी मी बोलत आहे. त्यावेळी हे लोक इतर दैवतांची पूजा करत होते.
3 पण मी, परमेश्वराने, तुमचा पूर्वज अब्राहाम याला नदीपलीकडल्या प्रदेशातून बाहेर काढले. कनान देशात त्याला बराच प्रवास घडवला आणि त्याला बरीच मुलेबाळे दिली. त्याला मी इसहाक हा त्याचा पुत्र दिला.
4 मग याकोब आणि एसाव हे दोन पुत्र इसहाकाला दिले. सेईर डोंगरा भोवतालची जमीन मी एसावला दिली. याकोब आणि त्याची मुलेबाळे येथे राहिली नाहीत. ती मंडळी मिसर देशात गेली.
5 मग मी मोशे आणि अहरोन यांना मिसरला पाठवले. त्यांच्यामार्फत मला माझ्या लोकांना मिसरमधून बाहेर काढायचे होते. त्यासाठी मी मिसरमधील लोकांना भयंकर त्रासदायक गोष्टींनी पिडले. आणि तुमच्या पूर्वजांना मिसरमधून बाहेर आणले.
6 अशाप्रकारे तेथून सुटका झाल्यावर ते समुद्रापर्यंत आले तरी मिसरमधील लोक त्यांचा पाठलाग करत होते. रथ, घोडेस्वार यांच्यासह त्यांनी पाठलाग केला.
7 तेव्हा त्यांनी माझा म्हणजे परमेश्वराचा धावा केला. म्हणून मी मिसरमधील लोकांना अनेक संकटांनी हैराण केले. समुद्राला त्यांना आच्छादून टाकायला लावले आणि त्यांना त्याने बुडवले. मिसरच्या सैन्याची मी काय स्थिती केली ती तुम्ही डोव्व्यांनी पाहिलीच आहे.त्यानंतर तुम्ही बरेच दिवस वाळवंटात काढलेत.
8 मग मी तुम्हाला यार्देन नदीच्या पूर्वेकडील अमोरी लोकांच्या प्रदेशात आणले. त्यांनी तुमच्याशी युध्द केले पण मी तुमच्यामार्फत त्यांचा पराभव केला. त्यांचा संहार करायचे सामर्ध्य मी तुम्हाला दिले. मग तुम्ही त्या प्रदेशाचा ताबा घेतलात.
9 त्यानंतर मवाबाचा राजा आणि सिप्पोरचा मुलगा बालाक याने इस्राएल लोकां विरुद्ध लढण्याची तयारी केली. त्याने बौराचा मुलगा बलाम याला बोलावणे पाठवून तुम्हाला शाप द्यायला सांगितले.
10 पण मी परमेश्वराने, बलामाचे म्हणणे ऐकायचे नाकारले. तेव्हा बलामाने तुम्हाला आशीर्वादच दिला. आणि मी तुमचे रक्षण करून तुम्हाला संकटातून बाहेर काढले.
11 मग तुम्ही यार्देन नदी पार करुन यरीहो येथे आलात. यरीहा मधील लोकांनी तुमच्याशी लढाई केली. अमोरी, परिज्जी, कनानी, हित्ती, गिर्गाशी, हिव्वी, यबूसी यांनीही लढाई केली. पण माझ्यामूळे तुम्ही त्यांचा पराभव करु शकलात.
12 तुमचे सैन्य चाल करून गेल्यावर मी त्याच्यापुढे गांधील माश्शा पाठवल्या. त्यांनी हैराण होऊन ते लोक चालते झाले. तेव्हा तलवार किंवा धनुष्य न वापरताच तुम्ही त्या प्रदेशाचा ताबा घेतलात.
13 मी परमेश्वराने, तुम्हाला ती जमीन दिली. तुम्हाला ती मिळवायला परिश्रम करावे लागले नाहीत. माझ्यामुळे ती तुम्हाला मिळाली. ती शहरे तुम्ही बांधली नाहीत-ती मी दिली. आता त्या जमिनीवर आणि त्या नगरांमध्ये तुम्ही राहात आहात. द्राक्षमळे आणि जैतून वृक्षांच्या बागा तुम्हाला मिळाल्या पण त्या तुम्हाला लावाव्या लागलेल्या नाहीत.”
14 मग यहोशवा लोकांना म्हणाला, “तुम्ही आत्ताच परमेश्वराचे शब्द ऐकलेत. तुम्ही त्याची आदरपूर्वक उपासना केली पाहिजे आणि प्रामाणिक पणाने त्याची सेवा केली पाहिजे. तुमच्या पूर्वजांनी ज्या खोट्या दैवतांची पूजा केली त्यांचा त्याग करा. फरात नदीच्या पलीकडे आणि मिसरमध्ये ते फार पूर्वी घडून गेले. आता फक्त या परमेश्वराचीच सेवा करा.
15 “पण कदाचित् या परमेश्वराची सेवा करणे तुमच्या मनात नसेल. तर ती निवड आजच करा. कोणाची उपासना करायची ते ठरवा. फरात नदीच्या पलीकडच्या तीरावर तुमचे पूर्वज राहात असताना त्यांनी ज्या दैवतांची पूजा केली त्यांना तुम्ही भजणार का? की या प्रदेशात राहणाऱ्या अमोऱ्यांचे दैवत आपले मानणार? तुमचे तुम्हीच ते ठरवा. मी आणि माझे कुटुंबीय यांच्यापुरते बोलायचे तर आम्ही याच परमेश्वराची सेवा करु.”
16 मग लोकांनी उत्तर दिले, “हाच आमचा परमेश्वर त्याच्या सेवेत खंड पडणार नाही आम्ही इतर दैवतांची पूजा करण्यासाठी आपल्या परमेश्वराला सोडणार नाही.
17 आमच्या पूर्वजांना याच परमेश्वर देवाने मिसरमधून बाहेर आणले. ते आम्ही जाणतो. तेथे आम्ही दास होतो. पण परमेश्वराने तेथे आमच्यासाठी चमत्कार घडवले. आम्हाला तेथून बाहेर आणले. एवढेच नव्हे तर इतर प्रदेशांतून आम्ही प्रवास करताना त्यानेच आमचे रक्षण केले.
18 “तेथील रहिवाश्यांना पराभूत करायला त्यानेच आम्हाला साहाय्य केले. आता आम्ही आहोत त्या भूमीवरील अमोरी लोकांचा पराभव करायलाही परमेश्वराचीच आम्हाला मदत झाली. तेव्हा आम्ही याच परमेश्वराची सेवा करणार. तोच आमचा देव आहे.”
19 त्यावर यहोशवा म्हणाला, “हे खरे नाही. सतत या परमेश्वराची सेवा करत राहणे तुम्हाला जमणार नाही. हा परमेश्वर देव पवित्र आहे. आपल्या लोकांनी इतर दैवतांची पूजा करण्याचा त्याला तिरस्कार वाटतो. तुम्ही त्याच्याकडे पाठ फिरवलीत तर तो तुम्हाला क्षमा करणार नाही.
20 तुम्ही या परमेश्वराचा त्याग करुन इतर दैवतांच्या भजनी लागलात तर तुमच्यावर संकटे कोसळतील. परमेश्वर तुमचा नाश करील. आजवर त्याने तुमचे भले केले आहे पण त्याच्या विरुद्ध गेलात तर तो तुमचा नाश करील.”
21 तेव्हा लोक यहोशवाला म्हणाले, “नाही! आम्ही या परमेश्वराचीच सेवा करु.”
22 यहोशवा त्यांना म्हणाला, “एकदा प्रत्येकाने स्वत: कडे आणि येथे जमलेल्या लोकांकडे पाहावे. या परमेश्वराचीच सेवा करायचे ठरवले आहे याबद्दल तुमच्या सर्वांच्या मनात खात्री आहे का? तुम्ही सर्वजण याला साक्षी आहात का?”लोक उत्तरले, “होय नि;संशय! आम्ही सर्वांनी याच परमेश्वराची सेवा करायचे ठरवले आहे.”
23 तेव्हा यहोशवाने त्यांना सांगितले, “तर मग तुमच्यापैकी कोणाजवळ खोटे दैवत असतील तर ते टाकून द्या. इस्राएलांच्याच परमेश्वर देवावर मनोभावे निष्ठा ठेवा.”
24 लोक यहोशवाला म्हणाले, “आम्ही या परमेश्वर देवालाच मानतो. आम्ही त्याचेच फक्त ऐकू.”
25 मग यहोशवाने त्या दिवशी शखेम या नगतरात लोकांशी करार केला. त्यांनी पाळायचे नियम सांगितले.
26 त्याने ही वचने परमेश्वराच्या नियमशास्त्रात लिहिली. मग एक मोठा दगड निवडून तो परमेश्वराच्या निवासस्थाना जवळच्या एला वृक्षाखाली उभा केला. हा दगड या करारची साक्ष होय.
27 मग यहोशवा सर्वांना उद्देशून म्हणाला, “आज आपण जे बोललो ते सर्व या दगडामुळे तुमच्या लक्षात राहील. परमेश्वर आज आमच्याशी बोलला तेव्हा हा दगड येथेच होता. तेव्हा आजच्या घटनेचे स्मरण म्हणून हा दगड राहिल. तुमच्याविरुद्ध हा साक्ष राहील. तुम्ही परमेश्वर देवाकडे पाठ फिरवायला लागलात तर हा तुम्हाला थोपवील.”
28 एवढे झाल्यावर यहोशवाने लोकांना घरी परतायला सांगितले. तेव्हा सर्वजण आपापल्या ठिकाणी परत गेले.
29 यानंतर नूनाचा पूत्र यहोशवा मरण पावला. त्याचे वय तेव्हा एकशेदहा वर्षे होते.
30 तिम्नाथ सेरह या आपल्या वतनाच्या गावी त्याचे दफन करण्यात आले. गाश डोंगराच्या उत्तरेला एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात हे ठिकाण आहे.
31 यहोशवाच्या हयातीत आणि त्याच्या निधनानंतरही इस्राएल लोकांनी परमेश्वराची सेवा केली. परमेश्वराने इस्राएलासाठी काय केले हे पाहिलेली वडीलधारी माणसे जिवंत असताना लोक परमेश्वराची उपासना करत राहिले.
32 इस्राएल लोकांनी मिसरमधून बाहेर पडताना योसेफच्या अस्थी बरोबर बाळगल्या होत्या. त्या त्यांनी शखेम येथे पुरल्या. शखेम नावाच्या माणसाचे वडील हमोर याच्या मुलाबाळांकडून याकोबने हा भूभाग शंभर रौप्यमुद्रांना विकत घेतला होता. हा प्रदेश योसेफच्या मुलाबाळांच्या मालकीचा झाला.
33 अहरोनाचा मुलगा एलाजार हाही मरण पावला. एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील गिबा येथे त्याचे दफन करण्यात आले. एलाजारचा पुत्र फिनहास याला गिबा हा प्रदेश मिळाला.