लेवीय

अध्याय : 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27


धडा 1

1 परमेश्वर देव दर्शनमंडपातून मोशेला हाक मारुन म्हणाला,
2 “इस्राएल लोकांना असे सांग: की जेव्हा तुम्ही परमेश्वराला पशूबली अर्पिता तेव्हा तो प्राणी तुमच्या पाळीव गुराढोरांच्या खिल्लारांतील किंवा शेरडांमेढारांच्या कळपातील असावा.
3 “जेव्हा एखाद्या माणसाला गुरांढोरांतले होमार्पण अर्पावयाचे असेल तेव्हा त्याने दोष नसलेला नर अर्पावा; तो त्याने दर्शनमंडपाच्या दारापाशी आणून अर्पावा म्हणजे परमेश्वर ते अर्पण मान्य करील.
4 त्या माणसाने यज्ञपशूच्या डोक्यावर आपला हात ठेवावा म्हणजे तो पशू त्याच्याबद्दल प्रायश्चित म्हणून मान्य होईल.
5 “त्याने परमेश्वरासमोर तो गोऱ्हा वधावा आणि अहरोनाचे मुलगे जे याजक आहेत त्यांनी त्याचे रक्त दर्शनमंडपाच्या दारापाशी असलेल्या वेदीवर व वेदीच्या सभोंवती शिंपडावे.
6 याजकाने त्या यज्ञपशूचे कातडे काढावे व मग त्याच्या शरीराचे तुकडे करावे.
7 नंतर अहरोन याजकाच्या मुलांनी वेदीवर विस्तव ठेवावा व नंतर त्याच्यावर लाकडे रचावी;
8 त्यांनी वेदीवरच्या विस्तवावरील लाकडावर त्या पशूचे तुकडे, डोके व चरबी रचावी;
9 त्याचे पाय व आंतडी पाण्याने धुवावी, मग याजकाने सर्व भागांचा वेदीवर होम करावा; हे होमार्पण परमेश्वरासाठी आहे; त्याच्या सुवासामुळे परमेश्वराला आनंद होतो.
10 “कोणाला कळपामधून शेरडू वा मेंढरु होमार्पण करावयाचे असल्यास त्याने दोष नसलेला नर अर्पावा.
11 त्याने वेदीच्या उत्तरेस परमेश्वरासमोर तो वधावा; मग अहरोनाचे मुलगे जे याजक आहेत त्यांनी त्याचे रक्त वेदीवर व वेदीच्या सभोंवती शिंपडावे.
12 मग याजकाने त्या पशूचे कापून तुकडे करावेत व त्याने ते तुकडे, डोके व चरबी वेदीवरील विस्तवाच्या लाकडावर रचावी.
13 त्याचे पाय व आंतडी पाण्याने धुवावी; मग याजकाने त्या सर्व भागांचा वेदीवर होम करावा; हे होमार्पण परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय; त्याच्यामुळे परमेश्वराला संतोष होतो.
14 “जेव्हा कोणाला परमेश्वरासाठी पक्षाचे होमार्पण करावयाचे असेल तेव्हा त्याने होले किंवा पारव्याची पिले आणावी.
15 याजकाने तो पक्षी वेदीजवळ आणावा, त्याचे मुंडके मुरगाळून उपटून काढावे व वेदीवर त्याचा होम करावा आणि त्याचे रक्त वेदीच्या बाजूवर निचरून टाकावे.
16 त्याने त्याचा चुनाळ व पिसे काढून वेदीच्या पूर्वेस वेदीवरील राख टाकण्याच्या जागी फेकून द्यावी.
17 त्याने तो पक्षी पंखाच्या तेथून फाडावा, परंतु त्याने त्याचे दोन भाग वेगळे करु नयेत; मग याजकाने त्या पक्षाचा वेदीवरील जळत्या लाकडावर होम करावा; हे पण होमार्पण आहे. त्याच्या सुवासामुळे परमेश्वराला आनंद होतो.